08 December 2019

News Flash

चीनचे अध्यक्ष जिनपिंग-मोदी यांच्यात ११ ऑक्टोबरपासून चर्चा

चीनने लडाख हा केंद्रशासित प्रदेश करण्यावर याआधीच आक्षेप घेतला होता.

नवी दिल्ली : चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे ११ ऑक्टोबरपासून भारत दौऱ्यावर येत असून ते चेन्नईजवळील मामलापूरम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत अनौपचारिक शिखर बैठकीत चर्चा करणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा केवळ पन्नास तास आधी म्हणजे विलंबाने करण्याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

चीनमधील वुहान येथे जशी अनौपचारिक शिखर बैठक झाली होती तशीच ही शिखर बैठक अनौपचारिक आहे. भारत व चीन या देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांनी बुधवारी याबाबत एकाचवेळी घोषणा केली असून चेन्नईजवळच्या मामलापूरम या शहरात जिनपिंग यांच्या स्वागताची जोरदार स्वागताची तयारी सुरू आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, उभय नेते द्विपक्षीय, प्रादेशिक व जागतिक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. त्यातून दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध सुधारणार आहेत. जिनपिंग यांच्या भेटीची अधिकृत घोषणा केवळ पन्नास तास अगोदर करण्यात आली असून या विलंबामागे जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून दोन केंद्रशासित प्रदेश करण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा संबंध जोडण्यात येत आहे.

सरकारी सूत्रांनी सांगितले की, भारताची याबाबतची भूमिका स्पष्ट असून काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा मुद्दा हा सार्वभौम व घटनात्मक असून त्यावर चर्चा करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जर चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा मुद्दा समजून घ्यायचा असेल तर पंतप्रधान मोदी त्यांना त्याबाबत माहिती देतील.  चीनने लडाख हा केंद्रशासित प्रदेश करण्यावर याआधीच आक्षेप घेतला होता. त्यावर  भारताने असे म्हटले आहे की, तो केंद्रशासित प्रदेश करावा अशी तेथील स्थानिक जनतेची मागणी होती. शिवाय तो प्रदेश केंद्रशासित करण्याने भारत व चीन यांच्यातील सीमेवर काहीच परिणाम होणार नाही.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अलीकडेच चीनला भेट देऊन जिनपिंग यांच्याशी चर्चा केली असली तरी त्यांच्यातील चर्चा हा  द्विपक्षीय मुद्दा आहे. मामलापूरम येथे होणारी अनौपचारिक शिखर बैठक ही एका मुद्दय़ावरची नाही, तर त्यात अनेक मुद्दय़ांवर चर्चा होणार आहे. इम्रान यांची जिनपिंग यांच्याशी या बैठकीपूर्वी चर्चा घडवून आणण्यात चीनचा वेगळा हेतू असावा असे भारताला वाटत नाही, असे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.

First Published on October 10, 2019 3:08 am

Web Title: chinese president xi jinping pm modi to meet in chennai on october 11 and 12 zws 70
Just Now!
X