वॉशिंग्टन : चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी गेल्या आठवडय़ात तिबेटला दिलेली भेट ही भारतासाठी धोकादायक असून ती एक धमकीच आहे, असे अमेरिकी काँग्रेसच्या एका सदस्याने म्हटले आहे.

चीनची आगेकूच रोखण्यासाठी अमेरिका पुरेशी पावले उचलताना दिसत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. जिनपिंग यांनी गेल्या बुधवारी तिबेटमधील निंगची येथे तीन दिवसांची  भेट दिली होती. जिनपिंग हे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आहेत. त्यांनी तिबेटच्या लष्करी कमांडमधील अधिकाऱ्यांची भेट घेऊन या भागातील विकास प्रकल्पांबाबत चर्चा केली होती.

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत रिपब्लिकन नेते डेव्हीन न्यून्स यांनी सांगितले की, गेल्याच आठवडय़ात चीनचे हुकूमशहा जिनपिंग हे भारताच्या सीमेलगत असलेल्या तिबेटमध्ये गेले होते. तीस वर्षांत प्रथमच  असे घडले असून त्यांची ही भेट म्हणजे भारताला एक प्रकारे धमकीच आहे. चीन तेथे मोठा जलप्रकल्प उभारणार असून त्यामुळे भारताचे पाणी तोडले जाणार आहे. निंगची येथील भेटीत त्यांनी न्यांग नदीवरील पुलाची पाहणी केली. ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यातील परिसंस्थात्मक संवर्धनाचाही त्यांनी आढावा घेतला. या नदीला त्या भागात यारलुंग झांगबो असे संबोधले जाते. तो तिबेटी शब्द आहे. चीनने यावर्षी ब्रह्मपुत्रा नदीवर मोठे धरण बांधण्याचा प्रकल्प मंजूर केला होता. त्यामुळे भारत- बांगलादेश व चीन यांच्यात वाद झाले होते. चीनची आगेकूच सुरू असून ती रोखण्यासाठी बायडेन प्रशासनाने काही केले नाही असा आरोप न्यून्स यांनी केला आहे.