मलेशियाच्या बेपत्ता झालेल्या विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून संकेत मिळाल्याचा दावा चीनच्या शोध जहाजाने शनिवारी केल्याची माहिती चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या महिन्याभरापासून विमानाचा शोध सुरू आहे. त्यामुळे हिंदूी महासागरात ब्लॅक बॉक्समधून संकेत मिळाल्याचे वृत्त महत्त्वाचे मानले जात आहे.
विमानाचा शोध घेणाऱ्या हैक्सन ०१ या जहाजाला शनिवारी दक्षिणेकडील हिंदी महासागरात प्रतिसेकंद ३७.५ किलो हर्टझचे संकेत पाण्यातून मिळत असल्याचे शनिवारी सांगण्यात आल्याची माहिती सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले आहे.मात्र हे बेपत्ता विमानाशी संबंधित आहेत किंवा कसे, याबाबतची अद्याप पुष्टी झालेली नाही.
८ मार्च रोजी अचानक बेपत्ता झालेल्या या विमानात पाच भारतीयांसह २३९ प्रवासी होते. या विमानाचा अद्याप शोध लागलेला नसून ते दुर्घटनाग्रस्त झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बेपत्ता विमानाची नेमकी माहिती मिळावी यासाठी हिंदी महासागरात या विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. ब्लॅक बॉक्समधून विमानातील सर्व घडामोडींची नोंद होत असते आणि सुमारे ३० दिवस ती नोंद कायम राहते. मात्र ३० दिवसानी बॅटरी संपल्यानंतर कोणतीही माहिती प्राप्त होत नाही. त्यामुळे पुढील तीन दिवसांत ही बॅटरी शोधून काढण्याचे मोठे आव्हान शोधकार्य करणाऱ्यांसमोर
आहे.
दरम्यान, चीनच्या जहाजाने ब्लॅक बॉक्समधून संकेत मिळत असल्याचे स्पष्ट केल्यामुळे विमानाबाबतची माहिती उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.