News Flash

भारतीय सैन्यांकडूनही चोख उत्तर, चीनचे ४३ जवान ठार आणि गंभीर जखमी

भारतीय जवानांसोबत झालेल्या चकमकीत चीनचंही नुकसान

संग्रहित छायाचित्र

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव वाढण्याची शक्यता आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक आपापसात भिडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. एएनआयने सरकारी सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारताचे जवळपास २० जवान शहीद झाले आहेत. दरम्यान भारतानेही चीनला चोख प्रत्युत्तर दिलेलं असून त्याचे जवळपास ४३ जवान ठार तसंच गंभीर जखमी झाले आहेत. एएनआयकडे सुत्रांनी ही माहिती दिल्याचं सांगितलं आहे. या जवानांना एअरलिफ्ट करण्यासाठी वास्तविक नियंत्रण रेषेवर हेलिकॉप्टर्सची हालचादेखील वाढली असल्याचं सुत्रांकडून समजलं आहे.

भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव असून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सोमवारी रात्री हिंसक चकमक झाली. यावेळी कोणताही गोळीबार झाला नसल्याचं भारतीय लष्कराने स्पष्ट सांगितलं आहे. पण यावेळी दोन्ही देशांचे सैन्य आपापसांत भिडले होते. यामध्ये दोन्ही देशांचं नुकसान झालं असल्याचं समोर येत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने काय सांगितलं आहे –
चीनने भारतीय सैन्यांनी वास्तविक नियंत्रण रेखा पार करुन दोन वेळा आपल्या सैन्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान भारताकडूनही परराष्ट्र मंत्रालयानेही संपूर्ण घटनाक्रम सांगण्यात आला असून चीनकडून वास्तविक नियंत्रण रेखा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “१५ जूनच्या रात्री चीनकडून एकतर्फीपणे वास्तविक नियंत्रण रेषेवरील सद्यस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन्ही सैन्यांचं नुकसान झालं आहे जे टाळता आलं असतं. चीनकडून ६ जून रोजी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर तसंच वाद कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यासंबंधी झालेल्या सहमतीचं उल्लंघन करण्यात आलं”.

“सीमा परिसरात शांतता नांदली पाहिजे आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला पाहिजे या भूमिकेवर आम्ही अद्यपही ठाम आहोत. पण याचवेळी भारताचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता सुनिश्चित करण्यासाठी कटीबद्ध आहोत,” असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

सीमा व्यवस्थापनाकडे एक जबाबदार देश म्हणून पाहताना भारत वास्तविक नियंत्रण रेषेच्या आतमध्ये राहूनच हालचाल करणार हे स्पष्ट आहे. चीनकडूनही आम्ही तशीच अपेक्षा करत आहोत असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 10:29 pm

Web Title: chinese side suffered 43 casualties including dead and seriously injured in face off in the galwan valley sgy 87
Next Stories
1 मोठी बातमी! चीनसोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद, संख्या वाढण्याची भीती
2 चीनकडून करण्यात आला LAC बदलण्याचा प्रयत्न, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितला घटनाक्रम
3 नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारताच्या सीमा अबाधित आहेत आणि राहणार – जे पी नड्डा
Just Now!
X