सिक्किम सीमेवर भारत आणि चीनच्या लष्करांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष होताना पाहायला मिळतो आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंधदेखील ताणले गेले आहेत. चीनकडून सातत्याने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली जाते आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये चिनी सैनिकांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये तीनवेळा चीनकडून तीन वेळा लडाखमध्ये घुसखोरी करण्यात आली आहे. उत्तर लडाखमधील ट्रॅक जंक्शन, मध्य लडाखच्या प्योगोंगशोक लेक आणि दक्षिण लडाखच्या चुमरमध्ये चीनकडून सातत्याने घुसखोरी केली जाते आहे.

गेल्या ४५ दिवसांमध्ये चिनी सैन्याने तब्बल १२० वेळा सीमा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला आहे. मागील वर्षभराचा विचार करता चीनकडून २४० वेळा घुसखोरी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये चिनी सैनिकांनी वारंवार सीमा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला आहे. लडाख सेक्टरमध्ये चीनकडून सर्वाधिक घुसखोरी झाली आहे. याशिवाय उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यात चीनने चारवेळा हवाई क्षेत्राचे उल्लंघन करत भारतात घुसखोरी केली आहे.

भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनकडून भारतावरच घुसखोरीचे आरोप केले जात आहेत. यासोबतच चीनकडून भारताला सैन्य मागे घेण्यासाठी धमक्यादेखील दिल्या जात आहेत. ‘सिक्किम सीमेवर निर्माण झालेल्या तणाव प्रकरणात चेंडू आता भारताच्या कोर्टात आहे. दोन्ही देशांमधील तणाव कसा कमी करायचा, त्यासाठी कोणत्या उपायांचा वापर करायचा, हे सर्वस्वी भारताच्या हातात आहे,’ असे चीनचे राजदूत लू झाओहुई यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. यासोबतच या प्रकरणी कोणताही तोडगा काढण्यासदेखील त्यांनी नकार दिला आहे.

चीनच्या राजदूतांनी भारताला धमकी दिल्यावर चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सनेदेखील भारताला थेट इशारा दिला आहे. ‘भारताला पुन्हा एकदा धडा शिकवण्याची वेळ आली आहे. यावेळी भारताची अवस्था १९६२ पेक्षा वाईट करण्यात येईल,’ अशी धमकीच ग्लोबल टाईम्सने दिली आहे. ‘जर डोक्लाम प्रांतात सैन्याचा वापर करण्याचा विचार भारत करत असेल आणि एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानविरुद्ध युद्ध करण्याचे स्वप्न पाहात असेल, तर भारत चीनच्या सामर्थ्याला कमी लेखतो आहे,’ असेदेखील ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.