बीजिंग : चीनचे यंत्रमानव म्हणजे रोबोटयुक्त चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर अपेक्षित ठिकाणी मंगळवारी उतरले .  चँग इ-५ हे यान यशस्वीरित्या चंद्रावर उतरल्याचे चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने म्हटले आहे. चीनच्या अवकाश कार्यक्रमातील हे मोठे यश असून त्यातून मानवाला यापुढील काळात चंद्रावर उतरवण्यात चीनला यश येऊ शकते.

चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करुन ते पृथ्वीवर आणण्यासाठी चीनचे मानवरहित यान गेल्या  मंगळवारी चंद्राकडे रवाना झाले होते.  हे यान लाँग मार्च ५ या प्रक्षेपकाच्या मदतीने सोडण्यात आले होते. चँग इ ५ ही अतिशय गुंतागुंतीची चांद्र मोहीम असून त्यात अवकाश इतिहासावर भर देण्यात आला आहे. गेल्या चाळीस वर्षांच्या काळात जगात प्रथमच चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याची मोहीम राबवली जात आहे.

अमेरिकेने चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी अवकाशवीर पाठवले होते. रशियाने खडकांचे नमुने आणण्यासाठी मानवरहित मोहिमा राबवल्या होत्या. ही अवकाशयाने चंद्रावर जाऊन परत आली होती. चीनची मोहीम गुंतागुंतीची आहे कारण त्यात हे यान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केल्यानंतर  त्याचे लँडर व अ‍ॅसेंडर हे भाग चंद्रावर उतरले असून तेथील खडकांचे जास्तीत जास्त नमुने गोळा करणार आहे.