मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील गन कॅरेज फॅक्टरीत तयार केलेल्या देशी बोफोर्स धनुष तोफांच्या अखेरच्या चाचणीत सदोष बेअरिंग आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हे बेअरिंग जर्मनीतून मागवण्यात आले होते. परंतु, जर्मनीतील कंपनीने हे चीनमध्ये उत्पादित झालेले बेअरिंग भारतात पाठवले होते. चाचणीदरम्यान या बेअरिंगला तडे गेल्याचे आढळून आले.

गन कॅरेज फॅक्टरीचे संयुक्त व्यवस्थापक व जनसंपर्क अधिकारी संजय श्रीवास्तव यांनी रविवारी माध्यमांना याची माहिती दिली. ते म्हणाले, धनुष तोफांमध्ये वापरले जाणारे बेअरिंग पुरवण्याचे कंत्राट जर्मनीतील सीडब्ल्यूडी कंपनीला दिले होते. या कंपनीने निविदेत बेअरिंगचे दर कमी ठेवल्याने त्यांना कंत्राट मिळाले होते. वर्ष २०१३ मध्ये त्यांना हे कंत्राट देण्यात आले होते. परंतु, पुरवठा करताना कंपनीने चीनमध्ये बनवलेच्या बेअरिंगचा पुरवठा केला.

कंपनीने पाठवलेल्या बेअरिंगचा साठा सील करण्यात आला आहे. या फॅक्टरी एक डझनहून अधिक धनुष तोफांची निर्मिती करण्यात आली आहे. यातील अर्धा डझन तोफा चाचणीसाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आल्या होत्या. उर्वरित अर्धा डझन तोफा फॅक्टरीत ठेवण्यात आले आहेत. १८ धनुष तोफांच्या नवीन ऑर्डर ही मिळाली होती.

श्रीवास्तव म्हणाले, या तोफात लावण्यात आलेले सर्व सुटे भाग हे चाचणीच्या मापदंडानुसार असतात. त्यानंतरच त्या सुट्या भागांचा उपयोग केला जातो. धनुष तोफांची चाचणीही वेगवेगळ्या मापदंडानुसार केली जाते. चाचणीच्या अंतिम टप्प्यात बेअरिंगमध्ये तडे गेल्याने ते नाकारण्यात आले.