बीएसएफने बांगलादेश सीमेवरुन अवैधपणे भारतात प्रवेश करणाऱ्या एका चीनी नागरिकाला अटक केली. हा चीनी नागरिक पश्चिम बंगालच्या मालदामध्ये प्रवेश करताना पकडला गेला. हा चीनी नागरिक गुप्तहेर होता हे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्याचे नाव हान जुनवेई (३६ वर्षे) आहे. जुनवेई चुकीच्या हेतूने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होता. म्हणून त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जुनवेई याच्या एका साथीदाराला उत्तर प्रदेश पोलिसांच्या अँटी टेरर स्क्वॉडने (एटीएस) अटक केली आहे. चौकशी दरम्यान हान जुनवेई याने खुलासा केला की त्याचा साथीदार दरमहा १०-१५ भारतीय सिम कार्ड चिन मध्ये पाठवत होता. जुनवेई यांनी सांगितले की, गुरुग्राममध्ये त्याचे एक हॉटेल आहे, ज्यात इतर अनेक चीनी नागरिक कार्यरत आहेत.

हेही वाचा- बेकायदेशीर खाणीत १२ दिवसांपासून मजूर अडकल्याची भीती, सरकारने घातलं नौदलाला साकडं

चीनी गुप्तहेराचा तपास केला असता त्याच्याकडे, चायनीज पासपोर्ट, एक अ‍ॅपल लॅपटॉप, २ आयफोन मोबाइल, १ बांगलादेशी सिम, १ भारतीय सिम, २ चीनी सिम, २ पेन ड्राईव्ह, ३ बॅटरी, दोन लहान टॉर्च, ५ पैशांचे व्यवहार मशीन, २ एटीएम कार्ड, यूएस डॉलर अन्य वस्तू सापडल्या.

चौकशी दरम्यान त्याने सांगितले की, २०१० साली तो प्रथम हैदराबादला आला होता. त्यानंतर तो २०१९ नंतर तीनवेळा दिल्ली-गुरुग्राम येथे आला होता. त्याचा सध्याचा पासपोर्ट चीनच्या हुबेई प्रांताचा आहे, जो याच वर्षी जानेवारी २०२१ मध्ये देण्यात आला होता.