लडाख सीमेवरचा तणाव कमी करण्यासंदर्भात भारतीय आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यामध्ये पाच कलमी कार्यक्रमावर एकमत झाले आहे. त्याचे चीनमधल्या सरकारी प्रसारमाध्यमांनी सावध स्वागत केले आहे. अंतिमत: यातून चांगलं काही तरी घडवण्याची जबाबदारी भारताची आहे असं चिनी माध्यमांनी म्हटलं आहे.

शांघाय सहकार्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री मॉस्कोमध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यात बैठक झाली. या पाच कलमी कार्यक्रमात सीमेवर शांतता आणि स्थिरता ठेवण्यासाठी पूर्वी झालेले करार, शिष्टाचाराचे पालन करायचे तसेच तणाव वाढेल अशी कोणतीही कृती टाळायची असे ठरले आहे.

“सीमेवरील सध्याची स्थिती कोणाच्याही हिताची नाही हे दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मान्य केले. सीमेवर स्थिती सुधारण्यासाठी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु ठेवण्यावर दोघांमध्ये एकमत झाले आहे. दोन्ही सैन्यांमध्ये योग्य अंतर राखायचे आणि तणाव कमी करायचा” परराष्ट्र मंत्रालयाच्या स्टेटमेंटमध्ये हे म्हटले आहे.

वँग यी यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याबरोबर सीमेवरील स्थिती आणि द्विपक्षीय संबंधांबद्दलही सविस्तर चर्चा केली असे शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. भारत आणि चीन दोन्ही मोठे देश असल्याने मतभेद असणे स्वाभाविक आहे असे वँग यांनी म्हटल्याचे शिन्हुआने आपल्या वृत्तात म्हटले आहे. तणाव कमी करण्यासाठी चेंडू आता भारताच्या कोर्टात आहे असे भारताला वारंवार इशारे देणाऱ्या ग्लोबल टाइम्सचे मत आहे.