सध्या जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत करोना हा चीननं तयार केलेला व्हायरस असल्याचे आरोप अनेकांकडून करण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीदरम्यान युरोपिय युरोपिय युनियनच्या प्रस्तावाचं समर्थन दिल्यामुळे चीनचा तीळपापड झाला असून चीननं ऑस्ट्रेलियाला अमेरिकेचा पाळीव कुत्रा असल्याचं बेजबाबदार वक्तव्य केलं. तसंच ऑस्ट्रेलियावरून आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंवरही बंदी घालण्याचा चीनचा विचार सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं ऑस्ट्रेलिया अमेरिकेच्या हातचं बाहुलं असल्याचा आरोप केला आहे. तसंच जागतिक आरोग्य संघटनेत युरोपिय युनिअनच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा अर्थ ऑस्ट्रेलिया संपूर्ण प्रकरणात अपयशी ठरला आहे असा होत असल्याचा आरोपही संपादकीयमध्ये करण्यात आला आहे. करोना व्हायरसच्या उत्पत्तीची स्वतंत्र तपासणी व्हावी अशी मागणी ऑस्ट्रेलियानं केली आहे. तसचं ऑस्ट्रेलिया चीनलाच लक्ष्य करत आहे.

ऑस्ट्रेलियाचं नुकसान

ऑस्ट्रेलियाचे नेते चीनवर निशाणा साधत आहेत. परंतु यामुळे त्यांचच नुकसान होत आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्ये चीनविरोधी वातावरण तयार होत आहे. चीनसोबत हा तणावाचा परिणाम ऑस्ट्रेलियातील शेतकऱ्यांवर होऊ शकतो, असंही ग्लोबल टाईम्समध्ये नमूद करण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा आक्षेप

करोना व्हायरसच्या उत्पत्तीवर ऑस्ट्रेलियानं स्वतंत्र तपास करण्याची मागणी केली आहे. ही मागणी कोणत्याही विनोदापेक्षा कमी नाही, असं चीनच्या दुतावासानं म्हटलं होतं. यावर ऑस्ट्रेलियातील मंत्री सिमोन बर्मिंगम यांनी निषेध व्यक्त केला. तसंच आम्ही चीनच्या दुतावासासोबत कोणतीही चर्चा करणार नाही, असंही ते म्हणाले.

चीन आयात शुल्क वाढवणार

दोन्ही देशांमध्ये तणाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं त्याचा परिणाम व्यापारावरही दिसून येत आहे. चीननं ऑस्ट्रेलियातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर ८० टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच काही वस्तूंची आयात बंद करण्यासाठी एक यादीही तयार करण्यात आली आहे. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियानं चीनमध्ये १८ अब्ज डॉलर्सची आयात केली होती.