पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमधील तणाव अद्याप शांत झालेला नाही. पुन्हा एकदा चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पूर्व लडाखमधील डेमचोक येथील चार्डींग नाल्याच्या बाजूला भारताच्या हद्दीत चीनने तंबू उभारले आहेत, अशी माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी या तंबूत राहणारे लोक तथाकिथित नागरिक असल्याचे म्हटले आहे. त्यांना परत जाण्यास सांगितले असले तरी अद्याप ते तिथेच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वीही डेमचोक येथे भारतीय आणि चिनी सैनिक समोरासमोर आले होते. १९९० च्या दशकात भारत-चीन जॉईन्ट वर्किंग ग्रुप (जेडब्ल्यूजी) च्या बैठकीत, दोन्ही पक्षांनी मान्य केले होते की डेमचॉक आणि ट्रिग हाइट्स हे वास्तविक नियंत्रण रेषेजवळील (एलएसी) विवादित भाग होते. यानंतर दोन्ही देशांमध्ये नकाशांची देवाणघेवाण झाली होती आणि एलएससीच्या १० वेगवेगळ्या भागांना मान्यता देण्यात आली. ज्यामध्ये समर लुंगपा, देप्संग बल्गे, पॉइंट ६५५६, चांगलंग नाला, कोंगका ला, पांगोंग त्सो उत्तर किनार, स्पॅन्गुर, माउंट सझुन, दामचेले आणि चुमार यांचा समावेश होता.

गेल्यावर्षी झालेल्या तणावानंतर या भागांव्यतिरिक्त पूर्व लडाखमध्ये पाच नव्या पॉइंटना मान्यता देण्यात आली. गलवान व्हॅलीमधील केएम१२०, श्योक सुला भागातील पीपी१५ आणि पीपी १७ ए, रेचिन ला आणि रेझांग ला हे हे पाच पॉइंट, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कावेबाज चीनच्या कुरापती; सीमेजवळ पुन्हा एकदा बांधकामाला सुरुवात

चीनने सोमवारी लष्करी अधिकारी पातळीवरील चर्चेच्या १२ व्या फेरीचा प्रस्ताव दिला होता, पण १९९९ च्या कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानवरील विजयाच्या स्मरणार्थ २६ जुलैला कारगिल दिवस साजरा करण्यात येणार असल्याने भारताने ही चर्चा काही दिवस पुढे ढकलण्यासाठी सांगितले. आता लष्करी अधिकारी पातळीवरील चर्चा आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात किंवा कदाचित आधी होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

याआधी लष्करी अधिकारी पातळीवरील चर्चा ही यावर्षीच्या एप्रिल महिन्यात झाली होती. यामध्ये दोन्ही देशांनी पूर्व लडाखमधून सैन्य माघे घेण्यावर चर्चा करण्यात आली होती. याबाबत अभ्यास करणाऱ्यांनुसार लष्करी अधिकारी पातळीवरील चर्चेस उशीर होत असला तरी दोन्हा बाजूकडील अधिकारी हॉटलाईन मार्फत एकमेकांच्या संपर्कात आहेत. याबाबत चर्चेची भूमिका सुरू झाल्यापासून दौलत बेग ओल्डी आणि चुशुल येथील हॉटलाईनवर दोन्ही बाजूंनी सुमारे १५०० वेळा संवाद साधण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सूत्रांच्या माहितीनुसार भारत सर्व विवादित भाग सोडण्यासाठी दबाव आणत आहे तर चीन तेथील सर्व सैन्य मागे घेण्याची मागणी करत आहे. यामुळेच या चर्चेला उशीर होत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलं.

सध्या स्थिती स्थिर असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे. पण हे २०१९ प्रमाणे नाही. सध्याची स्थिती ही गेल्यावर्षीपेक्षा अधिक चांगली आहे. फेब्रुवारीनंतर चीनने कोणतेही उल्लंघन केलेले नाही किंवा दोन्ही बाजूचे सैन्य समोरासमोर आलं नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितलं.