खास चीनसाठी बनवण्यात आलेल्या विशेष रणनितीक गटाची काल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. पूर्व लडाखमध्ये एकूणच चार ठिकाणी संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. तिथून आता चिनी सैन्याची माघारी फिरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या बैठकीत एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला व सरकारचे पुढचे पाऊल ठरवण्यासंबंधी चर्चा झाली.

चिनी सैन्य माघारी फिरण्यास सुरुवात झाल्यानंतर विशेष रणनितीक गटाची झालेली ही पहिली बैठक आहे. लडाखच्या गलवान भागातील पेट्रोलिंग पॉईंट १४ (गलवान खोरं), पेट्रोलिंग पॉईंट १५ (हॉट स्प्रिंग) आणि पेट्रोलिंग पॉईंट १७ (गोग्रा) येथून चिनी सैन्य माघारी फिरले आहे. चीनने या भागातून आपले वाहने, तंबू, सैन्य हटवले आहे. पण पँगाँग टीएसओ सेक्टरमध्ये मात्र चिनी सैन्य मागे हटण्याची प्रक्रिया अत्यंत धीम्यागतीने सुरु आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

पँगाँगमधील फिंगर फोर हा पहिल्यापासून कळीचा मुद्दा राहिला आहे. चीनने फिंगर फोरपर्यंत रस्ता बांधणी केली आहे तसेच बंकर, पीलबॉक्स, टेहळणी चौकी सुद्धा उभारली आहे. फिल्ड रिपोर्ट्सनुसार पूर्व लडाखमध्ये चिनी हवाई दलाच्या फायटर विमानांची उड्डाणे कमी झाली आहेत. पण जमिनीवर चिनी सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. अरुणाचल प्रदेश जवळच्या एलएसीवरही चीनने सैन्याची जमवाजमव केली आहे.

गलवान भागाच्या तुलनेत डेपसांगमध्ये अजूनही चिनी सैन्य मागे हटलेलं नाही. १७ हजार फूट उंचावर असलेल्या डेपसांगमध्ये चिनी सैन्याची आक्रमक भूमिका कायम आहे. डेपसांग राकी नाला भागात चीनने घुसखोरी केल्यामुळे भारतीय सैन्याला पॉईंट १०, ११, ११ए आणि १३ पर्यंत पेट्रोलिंग करता येत नाहीय. पँगाँग टीएसओ आणि डेपसांगमधील चिनी सैन्याच्या हालचालींवर भारतीय सैन्याचे अत्यंत बारीक लक्ष आहे. भारताने सुद्धा या भागात पूर्ण सज्जता ठेवली आहे.