29 May 2020

News Flash

भारताच्या ‘त्या’ चार भागांवर ड्रॅगनची नजर, तिथेच घडल्या घुसखोरीच्या ८० टक्के घटना

चीनकडून होणाऱ्या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली तर त्यामध्ये एक समान पॅटर्न दिसून येतो.

वर्चस्व गाजवण्याची चीनची जुनी खोड आहे. त्यामुळे सध्या लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनकडून होणाऱ्या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली तर त्यामध्ये एक समान पॅटर्न दिसून येतो. भारत आणि चीनमध्ये लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत ३,४८८ किलोमीटरपर्यंत सीमारेषा आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

२०१५ पासून चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली तर ८० टक्के घुसखोरीच्या घटना या चार भागांपुरता मर्यादीत आहेत. यातले तीन भाग हे पश्चिम सेक्टरमध्ये येणाऱ्या पूर्व लडाखमधले आहेत. काही दिवसांपूर्वी पॅनगाँग टीएसओ तलावाच्या भागात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली होती. त्यात दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले होते.

घुसखोरीच्या एकूण घटनांपैकी ट्रिग हाइटस आणि बुर्त्से या लडाखमधील दोन भागांमध्ये चीनकडून घुसखोरीच्या दोन तृतीयांश घटना घडल्या आहेत. २०१९ पासून चीनने दमचिलीच्या विरुद्ध दिशेला असलेल्या दोलीटँगो या नव्या एका भारतीय भागामध्ये घुसखोरी सुरु केली. २०१९ मध्ये चीनने इथे ५४ वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याआधीच्या चार वर्षात चीनने तिथे फक्त तीन वेळा घुसखोरी केली होती.

भारताची भूमिका
भारतीय सैन्य तुकडयांनी नियंत्रण रेषा ओलांडल्यामुळे लडाख आणि सिक्कीममध्ये तणाव निर्माण झालाय हा चीनचा आरोप भारताने गुरुवारी फेटाळून लावला. उलट भारतीय सैन्य आपल्या हद्दीत गस्त घालत असताना चीनकडून अडथळा निर्माण केला जातोय, असा आरोप भारताने केला.

सीमेवर शातंता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पण देशांच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी सर्व आवश्यक पावले उचलू असे भारताने स्पष्ट केले. नियंत्रण रेषेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी हे विधान केले. लडाखच्या गालवान व्हॅली भागात जास्त तणाव आहे. इथे दोन्ही देशांनी अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात केल्या आहेत.

अमेरिकेचा भारताला पाठिंबा
चीनच्या कृतीमधून त्यांचा त्रास देण्याचा हेतू दिसून येतो. दक्षिण चीनचा समुद्र असो किंवा भारतीय सीमा या चकमकींवरुन चीनपासून असलेला धोका लक्षात येतो असे अमेरिकेने म्हटले आहे. दक्षिण व मध्य आशियासाठीच्या अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी अ‍ॅलिस वेल्स यांनी ही टीका केली आहे.

“दक्षिण चीनचा समुद्र असो किंवा भारतीय सीमा चीनची आक्रमकता फक्त शब्दांपुरती मर्यादीत नाही. चीनचे चिथावणीखोर आणि दुसऱ्यांना त्रासदायक ठरणारे वर्तन आपण पाहत आहोत. त्यातून चीनला आपल्या वाढत्या शक्तीचा नेमका कसा उपयोग करायचा आहे? हा प्रश्न निर्माण होतो” असे अ‍ॅलिस वेल्स पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 11:00 am

Web Title: chinese troops focus on 4 lac locations test new areas in ladakh dmp 82
Next Stories
1 भारताच्या ‘मँगो मॅन’चा करोना योद्ध्यांना अनोखा सलाम; विकसित केला ‘पोलीस आंबा’ आणि ‘डॉक्टर आंबा’
2 “सगळीकडे नुसता धूर आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या, मी कसाबसा…” ‘त्याने’ सांगितलं विमानात काय घडलं
3 Coronavirus : देशभरात चोवीस तासांत 6 हजार 654 नवे रुग्ण, 137 मृत्यू
Just Now!
X