चीनच्या सैनिकांनी पुन्हा एकदा भारतीय सीमेचे उल्लंघन करून भारतात घुसखोरी केली आहे. तसेच भारतीय सैन्यदलाचे २ बंकरही उद्धवस्त केले आहेत. एवढेच नाही तर भारतीय सैनिकांना धक्काबुक्कीही केली आहे. गेल्या १० दिवसांपासून चीन आणि भारताच्या डोका भागात असलेल्या बॉर्डरवर दोन्ही देशांचे सैनिक आमने सामने आले आहेत.

चीनच्या सैनिकांनी तर कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या भारतीय यात्रेकरूंच्या एका समुहालाही अडवल्याची घटना ताजी आहे. तसेच चीनच्या सैनिकांना भारतात प्रवेश करू न देण्यासाठी भारताच्या सैनिकांना संघर्ष करावा लागतो आहे. लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल सैनिकांनी मानवी साखळी तयार केली आहे. त्याद्वारे ते अतिक्रमण रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. चीनच्या सैनिकांनी मात्र डोकामार्गे भारतात घुसून सैन्यदलाचे दोन बंकर उद्धवस्त केले आहेत.

२० जून रोजी दोन्ही सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये फ्लॅग मिटींग झाली. मात्र अजूनही सीमेवर तणाव कायम आहे. भूतान आणि तिबेटच्या सीमेवरून २००८ मध्ये चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केली होती. आज पुन्हा एकदा तसाच प्रकार डोकामध्ये घडला आहे. सिक्कीमपासून जवळ असलेली सीमा रेषा ओलांडत भारतीय जवानांना धक्काबुक्की करत चीनच्या सैनिकांनी भारतात प्रवेश केला आहे. भारत आणि चीन यांच्यातला सीमावाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. याच एका कारणामुळे चीनचे सैनिक भारतात घुसखोरी करतात.

भारत आणि चीन या दोन देशांमध्ये ४ हजार किलोमीटरची नियंत्रण रेषा आहे. ही नियंत्रण रेषा पूर्व, मध्य आणि पश्चिम भागांमध्ये वाटली गेली आहे. अरूणाचल प्रदेशमध्येही काही प्रमाणात घुसखोरी करून चीनने इथला ताबा घेतला आहे. तर उत्तराखंड, हिमाचल आणि सिक्कीम या राज्यामध्येही चीनने याआधी घुसखोरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणाऱ्या भेटीत चीनचा मुद्दा चर्चिला जाणार आहे. त्यात चीनच्या कारवाया रोखण्यासाठी दोन्ही देशांमध्ये एकमत होण्याची शक्यता आहे.