सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं असून लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेत चीनमध्ये एका तरुणीने आपल्यावर होणारा बलात्काराचा प्रयत्न रोखला. तरुणीने आपल्याला खोकला झाला असल्याचं नाटक करत वुहानमधून आलो असल्याची खोटी माहिती देताच तरुणाने घटनास्थळावरुन पळ काढला. चीनमधील वुहान येथून कोरोना व्हायरसची लागण होण्यास सुरुवात झाली असल्याचं बोललं जात आहे.

जिंगशॅन शहरात ही घटना घडली आहे. २५ वर्षीय तरुण शुक्रवारी रात्री तरुणीच्या बेडरुममध्ये घुसला होता. यावेळी त्याने बलात्काराचा प्रयत्न करताच तरुणीने सांगितलं की, आपण नुकतंच वुहानमधून परतलो असून कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यामुळेच आपण घरात एकटे आहोत. तरुणाला खात्री पटावी यासाठी तरुणीने खोकला आला असल्याचं नाटकही केलं.

तरुणीने कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याचं सांगताच तरुणाने तेथून पळ काढला. यावेळी त्याने तिच्याकडील काही रक्कम पळवून नेली. पोलिसांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण चोरी करण्याच्या उद्देशाने घऱात घुसला होता. यावेळी तरुणी घरात एक़टी असल्याने त्याने बलात्कार करण्याचा विचार केला.

तरुणीने पोलिसांना माहिती देताच शोध सुरु करण्यात आला. पण कोरोना व्हायरसच्या भीतीने तोंडाला मास्क लावले असल्याने शोध घेणं पोलिसांना कठीण जात होतं. पण अखेर तरुणाने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत चूक मान्य केली. सध्या त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ४२७ जणांचा मृत्यू झाला असून जगभरात आतापर्यंत २० हजार ७०० जणांना लागण झाली आहे.