जगभरामध्ये करोनाचा प्रसार झाल्यानंतर हा विषाणू चीनमधून आल्याचा आरोप अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांनी केला होता. चीनमधील हुबेई प्रांतामधील वुहान येथून हा विषाणू आज जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. हा व्हायरस मानवनिर्मित असल्याचं अमेरिकेसह अन्य देशांचे म्हणणे होते. त्यानंतर स्थानिक चिनी पत्रकारांनी देखील या व्हायरसबद्दल मोठे खुलासे केले. त्यांनी केलेल्या या वार्तांकनानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. करोनाकाळात चिनी सरकार योग्य काम करत नसल्याचं वार्तांकन करणाऱ्या झांन झान यांनाही पोलिसांनी मे महिन्यात ताब्यात घेतलं होत. लोकांमध्ये भांडणं लावणे आणि समाजात तणावाचं वातावरण निर्माण करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. सोमवारी या खटल्याची सुनावणी झाली. झांन यांना न्यायालायने दोषी ठरवत चार वर्षाच्या तुरूगंवासाची शिक्षा दिली आहे. दरम्यान झांग यांच्या वकिलांनी या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

मूळ पेशाने वकील असणाऱ्या ३७ वर्षीय झांन या मे महिन्यापासून पोलिसांच्या ताब्यात आहेत. झांन यांनी गेल्या वर्षाच्या शेवटी वुहानमध्ये करोनाचा उद्रेक झाल्यानंतर त्याबद्दल वार्तांकन केले होतं. करोना व्हायरसच्या सुरुवातीच्या काळात स्थानिकांना वेळेवर उपचार मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या. तसेच चिनी सरकार उद्भवलेली परिस्थिती जगासमोर येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते. यासंदर्भातील माहिती झांन यांनी सोशल मीडियावरून लाईव्ह येत जगासमोर आणली होती.

तब्बल आठ महिन्यांनी त्यांच्याविरुद्धच्या खटल्यावर सोमवारी सुनावणी झाली. झांग यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात पत्रकार आणि समर्थक हे शांघाय पुडोंग पिपल्स कोर्टासमोर जमा झाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना कोर्टाबाहेरच थांबवले.

झांग यांनी जूनमध्ये उपोषण सुरू केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. झांग यांना रुग्णालयात एका नळीद्वारे बळजबरीने अन्न दिले जात असल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केला. “जर त्यांनी मला कठोर शिक्षा दिली तर मी उपोषण करून तुरूंगातच मरेन,” असे झांग यांनी त्यांच्या वकिलांशी बोलताना सांगितले.

झांग यांची प्रकृती ढासळली आहे. तसेच डोकेदुखी, चक्कर येणे आणि पोटदुखी असे अन्य विकारही जडल्याचे अन्य एका वकिलाने सागितले आहे. झांग यांच्यावर २४ तास पाळत ठेवली जात आहे. त्यांना बाथरूमध्ये जाण्यासाठीसुद्धा एका व्यक्तीची मदत घ्यावी लागते, असे त्यांच्या वकिलाने सांगितले. काही आठवड्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे पथक हे करोना व्हायरसच्या उगमाचा शोध घेण्यासाठी चीनमध्ये जाणार आहे. परंतु त्याआधीच झांग यांच्या खटल्यावर सुनावणी झाली आहे.