नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपचे खासदार स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर आठवडाभर बेपत्ता असलेली तरुणी शुक्रवारी सकाळी राजस्थानमध्ये आढळली. ती सर्वोच्च न्यायालयातही हजर झाली असून पालकांशी बोलल्याशिवाय याप्रकरणात पुढे काय करायचे, हे ठरवता येत नाही, असे तिने सांगितल्याने तिच्या पालकांना दिल्लीस आणण्याचा आदेश न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिला.

ही मुलगी एका मित्राबरोबर राजस्थानात आढळल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयास सकाळी सांगितले. तेव्हा तिला आजच हजर करा, असा आदेश न्या. आर. भानुमती आणि न्या. ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने दिला. त्यानुसार तिला आणण्यात आले.

न्यायाधीशांच्या चेम्बरमध्ये तिची बाजू ऐकून घेण्यात आली. पालकांशी बोलल्याशिवाय आपल्याला उत्तर प्रदेशात परतायचे नाही, असे तिने न्यायाधीशांना सांगितले. तसेच आपल्या सुरक्षेसाठीच आपण तीन मित्र-मैत्रीणींसह गाव सोडून पळालो होतो, असेही तिने सांगितले.त्यामुळे तिच्या आई-वडिलांना दिल्ली पोलिसांनी शहाजहानपूरहून पूर्ण सुरक्षेत दिल्लीस आणावे, असा आदेश नंतर न्यायालयाने दिला. ही मुलगी चार दिवस दिल्लीत राहणार असून तिच्या सुरक्षेची पूर्ण काळजी सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने घ्यावी, असे न्यायालयाने सांगितले. याप्रकरणी पुढील सुनावणी २ सप्टेंबर रोजी होणार आहे.