चिटफंड कंपनीमार्फत चालविण्यात येणाऱ्या दूरदर्शन वाहिनीतील कर्मचाऱ्यांना वेतन न दिल्याबद्दल तृणमूल काँग्रेसचे खासदार कुणाल घोष, शारदा समूहाचे अध्यक्ष सुदीप्त सेन आणि अन्य दोघांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
वेतन देण्याबाबत सातत्याने आश्वासने देण्यात आली असतानाही गेल्या तीन महिन्यांपासून वेतन न दिल्याबद्दल वाहिनीच्या पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्री पार्क स्ट्रीट पोलीस ठाण्यात वरील पदाधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविला. वेतन दिलेले नसतानाही कर्मचाऱ्यांना काम करावयास भाग पाडण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे.
 दरम्यान, शारदा समूहाशी संबंध असल्याचा आरोप करून तृणमूल काँग्रेसने केंद्रीय मंत्री ए. एच. खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी याबाबत कोणतीही कारवाई न केल्याबद्दल त्यांच्या भूमिकेबद्दलही तृणमूल काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील चिटफंड घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी डाव्या पक्षांनी केली आहे. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेसारख्या मध्यवर्ती संस्थांनी चिटफंडसारख्या संस्थांना परवाना दिला असल्याने राज्य पातळीवरील चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही, असेही डाव्या पक्षांचे म्हणणे आहे.