हल्ल्यातून पतीला वाचविण्याच्या प्रयत्नात आंध्रप्रदेशातील चित्तूर शहराच्या महापौर कटारी अनुराधा यांना प्राण गमवावा लागला. महापालिका मुख्यालयातील अनुराधा यांच्या दालनात मंगळवारी दुपारी तीन शस्त्रधारी घुसले आणि त्यांनी अनुराधा यांचे पती कटारी मोहन यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. या वेळी अनुराधा या मोहन यांना वाचविण्यासाठी आडव्या आल्या. यात त्यांना गोळ्या लागून त्या गंभीर जखमी झाल्या. हल्लेखोरांनी गोळीबारानंतर दोघांवर शस्त्राने वार केले. या हल्ल्यात कटारी मोहन हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्लेखोरांना अनुराधा यांना लक्ष्य करायचे नव्हते. शस्त्रधारी महापौरांच्या दालनात घुसल्यानंतर त्यांनी कटारी मोहन यांच्या दिशेने गोळीबार केला. यात अनुराधा यांनी मोहन यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असावा आणि यात त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हल्लेखोरांपैकी दोघेजण वन टाऊन पोलीस ठाण्यात शरण आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनुराधा यांच्यावर अत्यंत जवळून गोळीबार करण्यात आला. यात एक गोळी त्यांच्या डोळ्यात घुसली. तर दुसऱ्या गोळीने त्यांच्या कपाळाचा भेद केला. तेवढय़ात कटारी मोहन यांनी महापौरांच्या खुर्ची आणि टेबलाचा आडोसा घेतला. तरीही शस्त्रधाऱ्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला आणि त्यांच्यावर शस्त्राने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.

पुतण्यावर संशय
तेलुगू देसम पार्टीच्या दोन गटातील अंतर्गत वादातून ही हत्या घडवून आणली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. या हत्येमागे कटारी मोहन यांचा पुतण्या के. चंद्रशेखर हात असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पाणी टँकरचे कंत्राट आणि रस्त्यांची कामे देण्यावरून चंद्रशेखर याचे कटारी दाम्पत्याशी वारंवार वाद होत होते. कटारी यांच्या निर्णयावर चंद्रशेखर हा उघडउघड मत व्यक्त करीत होता. त्यामुळे दोन्ही गटांतील संबंध ताणले गेले होते, अशी माहिती तेलुगू देसम पार्टीतील काही नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पोलीस कसून तपास करीत असून काही संशयितांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर शरण आल्याने तपासाला वेग येईल, असे पोलिसांनी सांगितले.