कौशल्य आधारित शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना आवडीचे शिक्षण घेता येईल, यामुळे विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करणे अधिक सोपे होईल व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढू शकेल. याबाबत विद्यापीठ व्यवस्थापन, कुलगुरू आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक यांच्याशी चर्चा करुन पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयीन शिक्षणामध्ये वैकल्पिक निवड तसेच कौशल्य (चॉईस बेस क्रेडिट सिस्टिम) योजना सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती शालेय शिक्षण शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी दिली.
दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये पत्रकार परिषद ते बोलत होते. तावडे म्हणाले, या नवीन शिक्षणप्रणाली मुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण तसेच सुप्त गुणांचा विकास होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण घेणे शक्य होईल. मोठया प्रमाणात कुशल कामगार राज्यासह देशाला मिळतील. राज्यातील काही विद्यापीठात कौशल्य आधारित शिक्षण देणे सुरू आहे. आता ही प्रणाली सर्वच विद्यापीठ स्तरावर सुरू होईल.
दिल्लीमधील विज्ञान भवनात विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यावतीने निवड आधारित श्रेणी व्यवस्था तसेच कौशल्य श्रेणी आधारित आराखडा याबाबत सर्व राज्यांच्या शिक्षण मंत्र्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीची अध्यक्षस्थानी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी होत्या. नागपूरमधील आयआयएमला स्मृती इराणी यांनी मंजुरी दिली असल्याचेही तावडे यांनी सांगितले.