‘दुसरे बोफोर्स’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या तीन हजार ६०० कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात दलाली घेतल्याच्या प्रकरणी सीबीआयने सोमवारी प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला. त्यातील संशयितांच्या यादीत माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी यांच्या नावाचा समावेश आहे.
एखाद्या घोटाळ्याच्या चौकशीत संशयित म्हणून लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे नाव येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी सन २००० मध्ये बराक क्षेपणास्त्र खरेदी व्यवहारातील दलालीप्रकरणी सीबीआयने केलेल्या चौकशीत माजी अ‍ॅडमिरल सुशीलकुमार यांचे नाव आले होते.
या चौकशी अहवालात माजी हवाई दलप्रमुखांशिवाय डोक्सा, ज्युली आणि संदीप त्यागी या त्यांच्या नातेवाईकांसह दहा जणांच्या नावांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे फिनमेक्कानिका आणि ऑगस्टा वेस्टलॅण्ड या दोन कंपन्यांचे नावही या प्राथमिक चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.