अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ३६०० कोटींची हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याच्या प्रकरणातील ब्रिटिश नागरिक असलेल्या मध्यस्थावर इंटरपोलने पुन्हा जागतिक रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. या व्यवहारात दलाली घेतल्याचा त्याच्यावर आरोप असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाचे मत आहे. ख्रिस्तीयन मिशेल जेम्स याच्यावर इंटरपोलने आंतरराष्ट्रीय वॉरंट काढले असून यापूर्वीही त्याच्यावर असे वॉरंट जारी केले होते. केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेच्या म्हणजे सीबीआयच्या आदेशावरून हे वॉरंट काढण्यात आले आहे. मेसर्स ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून हेलिकॉप्टर्स खरेदी करताना दलाली दिली गेली होती.

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्ट या कायद्यानुसार जेम्स याच्यावर नोटीस बजावताना या वेळी सक्तवसुली संचालनालयाच्या काही आरोपांचा समावेश करण्यात आला आहे. हे आरोप आधीच्या रेड कॉर्नर नोटिशीत समाविष्ट नव्हते. हे नवीन नोटिशीत समाविष्ट करण्यात आले असून त्यात भारतीय अधिकारी त्याच्यावर खटला चालवू इच्छितात असे म्हटले आहे. सीबीआयनेही त्याच्या अटकेची मागणी केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात इटलीचे कालरे गेरोसा व गुइडो राल्फ हाश्के तसेच जेम्स या तिघांवर विशेष न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहेत. या व्यवहारात ७ कोटी युरोची दलाली घेतली गेली असून त्यातील ३ कोटी युरो हे जेम्स व एफझेडइ या त्याच्या दुबईतील कंपनीला मिळाले आहेत तर बाकी रक्कम गेरोसा व हाश्के यांना मिळाली आहे.