ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळयातील आरोपी ख्रिश्चिअन मिशेलने २००९ ते २०१३ दरम्यान हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या प्रवासावर ९२ लाख रुपये खर्च केले होते अशी माहिती सीबीआयने शनिवारी विशेष न्यायालयाला दिली. मिशेलची कोठडी आणखी पाच दिवसांनी वाढवून मागताना त्याला चौकशीसाठी मुंबईला घेऊन जायचे आहे असे सीबीआयने न्यायालयाला सांगितले.

बचाव पक्षाच्या वकीलांनी मिशेलची कोठडी वाढवून मागण्याच्या सीबीआयच्या याचिकेला विरोध केला. आधीच पुरेसा वेळ दिला असून चौकशीतून काहीही निष्पन्न झालेले नाही असा बचाव पक्षाच्या वकीलांनी युक्तीवाद केला. ख्रिश्चिअन मिशेलची पाच दिवसांची कोठडी आज संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

मिशेलचे चार डिसेंबरला दुबईहून भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले. त्याला आधी पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आणखी पाच दिवसांची वाढ करण्यात आली. विशेष न्यायालयाने मिशेलला आणखी चार दिवसांची कोठडी सुनावली.

व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या हेलिकॉप्टर घोटाळयातील आरोपी ख्रिश्चिअन मिशेलने संपुआ सरकारमधील कुठलाही नेता किंवा संरक्षण मंत्रालयातील कुठल्याही अधिकाऱ्याला लाच दिल्याचा आरोप फेटाळला आहे. पण सल्लामसलत फी म्हणून ऑगस्ट वेस्टलँडकडून पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून ही हेलिकॉप्टर खरेदी करण्यात आली होती.

मूळ ब्रिटीश नागरिक असलेल्या ख्रिश्चिअन मिशेलचे मंगळवारीच सौदी अरेबियाने कुठल्याही अटी-शर्तीशिवाय भारताला प्रत्यार्पण केले. ख्रिश्चअनचे हस्ताक्षर असलेल्या चिठ्ठयांमध्ये पैसे दिल्याचा उल्लेख आहे पण  त्याने मी डिस्लेक्सिक आजाराचा रुग्ण असून लिहू शकत नाही असा दावा केला आहे. ज्या चिठ्ठयाांमध्ये राजकीय नेते आणि नोकरशहांना पैसे दिल्याच्या नोंदी आहेत त्या गुइडो हास्चके या युरोपियन मध्यस्थाने लिहिल्याचा दावा त्याने केला आहे.