X

संगीतकार चक बेरी यांचे निधन

मिसुरी येथील सेंट चार्लस् काऊंटी पोलीस विभागाने फेसबुकद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली.

गिटारवादनाने सर्वाना खिळवून ठेवणारे आणि आपल्या संस्मरणीय गाण्यांनी संगीताची नवी उंची दाखवून देणारे अमेरिकेतील महान गिटारवादक, गायक आणि गीतलेखक चक बेरी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी अमेरिकेतील मिसुरी येथे निधन झाले.

मिसुरी येथील सेंट चार्लस् काऊंटी पोलीस विभागाने फेसबुकद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. बेरी यांना तातडीने उपचारांसाठी वेंट्झव्हिले येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना जीवप्रणालीवर ठेवण्यात आले. मात्र अखेर डॉक्टरांचे हे प्रयत्न अपयशी ठरले. १९५० मध्ये आपल्या कारकिर्दीस प्रारंभ करणाऱ्या चार्लस् एडवर्ड्स अँडरसन बेरी यांनी नंतरच्या कालावधीत गिटारवादन आणि गाण्यांच्या माध्यमातून तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजविले. या कृष्णवर्णीय संगीतकाराने आपल्या गाण्यांच्या माध्यमातून श्वेतवर्णीय संगीत चाहत्यांनाही भुरळ पाडली. एल्व्हिस प्रेसली ‘रॉक अ‍ॅन रोल’चे सवरेत्कृष्ट संगीतकार, गायक होते. मात्र त्यांच्यानंतर हा मान केवळ बेरी यांना मिळाला.

‘जॉनी बी. गुड’, ‘रोल ओव्हर बीथओव्हेन’, ‘स्वीट लिटल सिक्स्टीन’, ‘मेबेलेन’ आणि ‘मेमफीस’ या गाण्यांच्या माध्यमांतून विसाव्या शतकात बेरी यांनी संगीत चाहत्यांना नित्यानंद दिला. गिटारवादनामुळे काही मोजक्या संगीतकारांसह बेरी यांच्याकडून युवकांना प्रेरणा मिळत असे.

अमेरिकेतील प्रसिद्ध संगीतकार बॉब डायलान यांनी बेरी यांना ‘रॉक अ‍ॅन रोल’चे शेक्सपिअर म्हटले आहे. या दोघांनी सोबत मिळून संगीतनिर्मिती केली आहे. तरुण, प्रेम, आयुष्यातील चांगले क्षण यावर आधारित गाण्यांची त्यांनी निर्मिती केली होती.

पहिला अल्बम..

जगभरातून संगीतकार चक बेरी यांना ट्विटरवरून आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. पाच महिन्यांपूर्वीच बेरी यांनी पहिला संगीत अल्बम प्रसिद्ध करण्याचे जाहीर केले होते. यामध्ये काही जुन्या आणि बऱ्याचशा नव्या गाण्यांचा समावेश करण्यात आला होता. या अल्बमला त्यांनी ‘चक’ असे नाव दिले होते. तो त्यांनी पत्नीला अर्पण केला होता.

First Published on: March 20, 2017 1:25 am
Outbrain