नोटबंदीमुळे चलनाचा तुटवटा निर्माण झाला असून यामुळे गोरगरीबांचे हाल होत आहेत. केरळमधील एका चर्चने या नोटबंदीच्या समस्येवर उतारा शोधला आहे. चर्चमधील दानपेटी सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली असून या दानपेटीतील पैसे घेऊन जा आणि शक्य होईल तेव्हा परत करा असा कौतुकास्पद उपक्रमच या चर्चने राबवला आहे. आता या चर्चच्या आदर्शवत उपक्रमाचे अन्य धार्मिक स्थळांनीही अनुकरण करण्याची गरज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली आहे. नोटबंदीनंतर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चलनाचा तुटवडा निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदील झाले आहेत. दैनंदिन गरजा कशा भागवायचा असा प्रश्न गोरगरीबांना पडला आहे. केरळच्या एर्नाकुलममधील सेंट मार्टीन चर्चने लोकांची ही समस्या हेरुन नवीन उपक्रम सुरु केला आहे. रविवारी चर्चमधील कार्यक्रमात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानुसार सकाळी साडे सहा आणि साडे आठच्या प्रार्थनेनंतर चर्चची दानपेटी खुली केली जाणार आहे. आमच्या चर्चच्या दानपेटीत कमी दराच्या नोटा जास्त असल्याने आम्ही त्या गोरगरीबांना देण्याचा निर्णय घेतला अशी माहिती चर्चच्या युवा समितीचे सदस्य शेल्सन फ्रान्सिस यांनी दिली.

एर्नाकुलममधील सेंट मार्टीन या चर्चमध्ये २०० कुटुंब येतात. यातील बहुसंख्य लोकांच्या बचत खात्यात पैसे नाही. तसेच त्यांना एटीएम कसे वापरतात हेदेखील माहित नाही. यात भर म्हणजे पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द झाल्याने आता त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. चर्चमध्ये येऊन अनेक जण फादरकडे त्यांच्या आयुष्यातील व्य़था मांडतात. नोटबंदीनंतर अनेकांनी आमच्याकडे गा-हाणे मांडले होते. म्हणूनच आम्ही दानपेटी उघडण्याचा निर्णय घेतला असे फ्रान्सिस यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत दानपेटीतील पैसे उधारीवर नेऊन जमेल तेव्हा परत करता येतील. एर्नाकुलममधील चर्चचा हा आदर्शवत उपक्रम सध्या देशभरात कौतुकाचा विषय ठरला आहे.