अमेरिकेत २०१६ मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप होता असे बोलले जात होते. यावरुन अमेरिकेतही यामुळे राजकारण चांगलेच तापले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशियाच्या हातचे बाहुले असल्याचेही म्हटले जात होते. यावर अनेकदा अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी असे काहीही नसल्याचे स्पष्टीकरणही दिले होते. मात्र, आता यामध्ये एक खळबळजनक खुलासा झाला आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था CIAच्या एका अधिकाऱ्याने खुलासा केला की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांनी व्यक्तिगतरित्या अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला होता. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

आपल्या या विधानाची पुष्टी करतना संबंधित अधिकाऱ्याने २०१७ मध्ये देण्यात आलेल्या काही सुचनांना डिकोड केल्याचा दावा केला आहे. CIAच्या अधिकाऱ्याने म्हटले की, पुतिन यांच्याकडून अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेपाची सुरुवात २०१६च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधीच झाली होती. रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प हे उमेदवार म्हणून समोर येत असल्याचे जेव्हा स्पष्ट झाले तेव्हा रशियाच्या हस्तक्षेपाच्या हालचाली वाढल्या होत्या.

CIAच्या अधिकाऱ्याने म्हटले की, निवडणुकीत रशियाच्या हालचाली वाढल्याची माहिती इतकी संवेदनशील होती की ही माहिती तत्कालीन सीआयएचे संचालक जॉन ओ ब्रेनन हे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या नेहमीच्या पत्रकार परिषदेपांसून दूर ठेवत होते. ब्रेनन अशी माहिती बंद लिफाफ्यामधून शेअर करीत होते. ही माहिती इतकी महत्वपूर्ण आणि संवेदनशील होती की, CIAच्या अधिकाऱ्यांनी खुलासा करणाऱ्या गुप्तहेराच्या नोंदींचे विश्षेलण केले होते.

दरम्यान, न्यूयॉर्क टाइम्सचे म्हणणे आहे की, CIAकडून या गुप्तहेरांच्या माहितीची विश्वसनीयता आणि सत्यता पडताळण्यासाठी अनेक प्रकारे विश्षेलण करण्यात आले होते. या प्रकारची माहिती समोर आल्यानंतर अमेरिकेच्या वृत्तपत्रांमध्ये खळबळजनक वृत्त छापून येत होते. मात्र, त्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसने या दाव्यांमध्ये दम नसल्याचे सांगत वारंवार हे वृत्त फेटाळून लावले होते.

सीआयएचे अधिकारी वारंवार त्या गुप्तहेराच्या माहितीतील पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्या गुप्तहेराने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेचा हवाला देत माहिती देण्यास नकार दिला होता. अशावेळी हा गुप्तहेर डबल एजंट म्हणून काम करत असावा असेही CIAला वाटले होते, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.