करोना व्हायरसला रोखू शकणारे औषध शोधण्यावर संपूर्ण जगभरात संशोधन सुरु आहे. पण अद्यापपर्यंत संशोधकांना त्यामध्ये यश आलेले नाही. करोना व्हायरसवर परिणामकारक ठरणाऱ्या कुठल्याही ठोस औषधाची निर्मिती झालेली नाही आणि तिच संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब आहे. दरम्यान सध्या काही ठराविक औषधे आहेत जी करोना व्हायरसवर प्रभावी ठरत आहेत.

अशाच औषधांपैकी एक आहे फॅव्हीपीरावीर. जपानमध्ये करोना व्हायरसच्या रुग्णांवर हे औषध परिणामकारक ठरल्याचे दिसून आले आहे. भारतातील औषध निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘सिप्ला’ भारत सरकारसोबत मिळून या फॅव्हीपीरावीर औषधावर काम करत आहे.

“हैदराबादमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टक्नोलॉजीसोबत मिळून या औषधावर आमचे काम सुरु आहे. पुढच्या सहा ते आठ महिन्यात हे औषध बाजारात आम्ही उपलब्ध करुन देऊ असे आम्हाला वाटते” सिप्लाचे चेअरमन वाय.के. हामिद यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.

“आम्हाला आता उत्पादनाचा वेग वाढवण्याची गरज आहे. पण सध्या आमचे कारखाने आणि कार्यालये बंद आहेत. मोठया प्रमाणावर उत्पादन करणे सध्या कठिण आहे. जीवनावश्यक वस्तूंमध्ये औषधांचा समावेश होतो. पण सध्या ट्रेन आणि बस सुरु नाहीयत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावर येतान अनेक अड़चणी येत आहेत. काय जीवनावश्यक आहे ते सरकार एकदा स्पष्ट करावे” असे हामिद म्हणाले.

कितपत प्रभावी आहे फॅव्हीपीरावीर
जपानी कंपनीने बनवलेले फॅव्हीपीरावीर हे औषध करोनाव्हायरसवर प्रभावी ठरत आहे. वुहान आणि शेनझेन येथे ३४० रुग्णांवर या औषधाच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या असे हँग शिनमीन या चीनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. हे औषध मोठया प्रमाणात सुरक्षित असून, उपचारामध्ये अत्यंत प्रभावी आहे असे हँग यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.

शेनझेनमध्ये चार दिवसांपूर्वी करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाला हे औषध दिल्यानंतर त्यांचा करोना व्हायरसचा अहवाल निगेटिव्ह आला असे एनएचकेने म्हटले आहे. फॅव्हीपीरावीर दिलेल्या रुग्णांच्या फुप्फुसामध्ये ९१ टक्के सुधारणा दिसून आली. ज्यांना हे औषध दिले नाही, त्यांच्यात ६२ टक्के सुधारणा झाल्याचे म्हटले आहे. फुजीफिल्म टोयामा केमिकलने हे औषध बनवले आहे.