करोनावर काही प्रमाणात उपयुक्त असलेल्या रेमडेसिविर औषधाची प्रजातीय आवृत्ती सिप्ला या बहुराष्ट्रीय कंपनीने उपलब्ध केली असून, एका कुपीसाठी ४ हजार रुपये दराने ते उपलब्ध केले जाणार आहे.

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने करोनावरील आपत्कालीन उपचारांकरिता रेमडेसिविर औषधाला मान्यता दिली होती. त्याची प्रजातीय आवृत्ती सिप्ला कंपनीने तयार केली आहे. याआधी कंपनीने शंभर मि.ग्रॅ.च्या कुपीसाठी पाच हजार रुपये आकारले होते व पहिल्या महिन्यात ८० हजार कुप्यांची विक्री करण्याचा उद्देश होता.

सिप्लाचे कार्यकारी उपाध्यक्ष निखिल चोप्रा यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीने ‘सिप्रीमी’ नावाने रेमडेसिविरची प्रजातीय आवृत्ती जारी केली असून ती जगात सर्वात कमी किमतीची आहे. अशा ८० हजार कुप्या पहिल्या महिन्यात उपलब्ध करून दिल्या जातील.

मायलान एनव्ही कंपनीने सोमवारी त्यांच्या प्रजातीय रेमडेसिविर औषधाची १०० मि.ग्रॅ.ची कुपी ४८०० रुपयांना मिळेल असे जाहीर केले असून हेटरो या हैदराबादच्या कंपनीने त्यांच्या औषधाची किंमत कुपीमागे ५४०० रुपये ठेवली आहे. गिलीड सायन्सेस इनकॉर्पोरेशनशी हेटरो, सिप्ला, ज्युबिलंट लाइफ सायन्सेस यांचे या उत्पादनासाठी निर्मिती वितरण करार झाले होते.