News Flash

करोना लस घेतल्यास एक लिटर पेट्रोल मोफत! लसीकरण वाढवण्यासाठी अजब-गजब ऑफर

जाणून घ्या कुठं होती ही ऑफर ; नागरिकांनी लस घेण्यासाठी केली गर्दी

नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जागृती करण्यासाठी लढवली गेली शक्कल.

सध्या देशातील नागरिकांना करोनाबरोबरच इंधन दर वाढीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंता व प्रचंड नाराजी दिसत आहे. तर, मागील काही दिवसांपासून करोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे, मात्र इंधन दरवाढ ही अद्यापही कायमच आहे. अनेक ठिकाणी पेट्रोलने शंभरी ओलांडल्याने सर्वसामान्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. असे असताना एका ठिकाणी पेट्रोल चक्क मोफत देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. करोना प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यास या मोफत पेट्रोलचा लाभ दिला गेला आहे.

झारखंडमधील पश्चिम सिंघभूम जिल्हयातील चक्रधरपूर येथे नागरिकांना करोना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही अनोखी युक्ती वापरली गेल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी करोना लस घेणाऱ्यास एक लिटर पेट्रोल मोफत देण्यात आलं आहे. एवढच नाही तर लस घेणाऱ्यास लकी ड्रॉ च्या माध्यमातून बक्षीस देखील दिलं जात आहे. या ठिकाणच्या आदिवासी नागरिकांमधील करोना लसीबाबतचा संकोच दूर करण्यासाठी ही अनोखी शक्कल लढवली गेली आहे.

येथील मारवाडी युवा मंच व इंडियन ऑईल पेट्रोल कॉर्पोरेशनच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्धाटन महिला व बालविकास आणि सामाजिक सुरक्षामंत्री जोबा माझी यांनी सिंघभूमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केले.

”आम्ही इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसोबत मिळून एक विशेष लसीकरण मोहीम राबवली. एकूण २४० जणांनी त्यांनी लस घेतल्यानंतर एक लिटर पेट्रोलचे मोफत कुपन दिले गेले. लस घेण्यास लोकांनी प्रेरीत व्हाव हा या मागचा उद्देश होता.” अशी माहिती मारवाडी युवा मंचचे नितीशकुमार बागरिया यांनी दिली. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

याप्रसंगी मंत्री जोबा माझी यांनी सांगितले की, ”प्रत्येक नागरिकाने तत्काळ लस घेऊन स्वतःला करोनापासून सुरक्षित केलं पाहिजे. लसीकरणाबद्दलच्या अफवांकडे लक्ष देऊ नये.”

या ठिकाणी करोना लस घेणाऱ्यांना लस घेतल्यानंतर एक लिटर पेट्रोल मोफत दिलं गेलं. तर, मोफत पेट्रोल मिळत असल्याने नागरिकांनी देखील लस घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 9:14 pm

Web Title: citizens got one liter of petrol free after taking corona vaccine msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘उत्तर प्रदेशातील लोकांची बदनामी थांबवा’; व्हायरल व्हिडिओवरुन योगी आदित्यनाथ यांची राहुल गांधींवर टीका
2 बिहारमध्ये राजकीय भूकंप; लोकजनशक्ती पक्षात उभी फूट! ५ बंडखोर खासदारांची हकालपट्टी!
3 “Fraud-To-Phone” चा पर्दाफाश; ८ जणांना अटक, ३०० मोबाईल जप्त
Just Now!
X