दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅलीत सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात बॅनर झळकावणाऱ्या दोन तरुणींना भाड्याच्या घरातून हाकलून काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यापैकी एका तरुणीने आम्ही निषेध नोंदवल्यानंतर जवळपास १५० जणांचा जणांचा जमाव घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता असा दावा केला आहे.
सुर्या राजप्पन असं यापैकी एका तरुणीचं नाव आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, “जेव्हा आम्हाला अमित शाह सीएएच्या समर्थनार्थ रॅली काढत असल्याची माहिती मिळाली तेव्हा आम्ही आमचा निषेध नोंदवण्याचा घटनात्मक आणि लोकशाही हक्क बजावण्याचा निर्णय घेतला. एक सामान्य नागरिक म्हणून अमित शाह यांच्यासमोर शांत पद्धतीने आपला निषेध नोंदवण्याची ही माझ्याकडे चांगली संधी होती. जर मी हे करण्यात अपयशी ठरले असते तर हा माझ्या सदसद्विवेकबुद्धीचाही पराभव असता”.
“अमित शाह यांची रॅली आमच्या गल्लीतून जात असताना माझ्यासोबत राहणारी माझी मैत्रीण आणि मी आमच्या बाल्कनीतून हे बॅनर झळकावलं. आम्ही निषेध नोंदवताना कोणतीही आक्षेपार्ह तसंच अपमानकारक भाषा न वापरण्याचं ठरवलं होतं,” असंही तिने सांगितलं आहे.
“आम्ही निषेध नोंदवल्यानंतर रॅलीतील काहीजण संतापले आणि आम्हाला धमक्या देत आक्षेपार्ह भाषा वापरु लागले. जवळपास १५० जणांचा जमाव आमच्या घराखाली जमला होता. आमचा बॅनर ओढून घेत फाडून टाकण्यात आला. तो जमाव आमच्या घराच्या दिशेने चालून आला आणि दरवाजा उघडला नाही तर तोडण्याची धमकी देऊ लागला. आम्हाला इतक्या हिंसक प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. आम्हाला भीती वाटल्याने घरातच कोंडून घेतलं. मात्र जमाव दरवाजा ठोठावत होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली तेव्हा कुठे जमाव शांत झाला,” अशी माहिती तरुणीने दिली आहे.
“पण इथे सगळं संपलं नाही. पायऱ्यावरुन जाताना लागणाऱ्या प्रवेशद्वाराला आमच्या घर मालकाने कुलूप लावलं. घरमालकदेखील त्या जमावात सामील होते. यामुळे आम्ही घरातच अडकून पडलो आणि कुठेही बाहेर पडणं शक्य नव्हतं. आम्ही आमच्या मित्र मैत्रिणींना फोन करुन मदत मागितली. आमचे मित्र मदतीसाठी पोहोचले असता जमावाने त्यांना अडवलं आणि धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनाही घऱात प्रवेश दिला गेला नाही. जवळपास तीन ते चार तास आम्ही आत अडकलो होतो. यादरम्यान आमच्या घरमालकाने तुम्हाला घरातून बाहेर काढत असल्याचं सांगितलं,” असं तरुणीने सांगितलं आहे.
“बऱ्याच वेळातनंतर आणि पोलीस, मित्रांनी मध्यस्थी केल्यानंतर वडिलांना आतमध्ये पाठवण्याची परवानगी त्यांनी दिली. पोलिसांनी जमावाविरोधातील आमची तक्रार दाखल करुन घेतली. सात तासांनी आम्हाला पोलिसांच्या सुरक्षेत घराबाहेर काढण्यात आलं. आम्ही आमचं सामान गोळा केलं आणि निघून गेलो,” असं तरुणीने सांगितलं आहे.
घरमालकाशी संपर्क साधला असता त्याने सांगितलं की, “सीएएविरोधात बॅनर झळकावल्यानंतर दुसऱ्या दिवशी तरुणी निघून गेल्या. त्यांच्या पालकांसोबत त्या निघून गेल्या असून कुठे गेल्या आहेत याची कल्पना नाही”. त्यांना घरातून बाहेर का काढलं असं विचारलं असता आपण त्यांना भाड्याने घर द्यायलाच नको होतं असं उत्तर त्यांनी दिलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 8, 2020 2:38 pm