सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आज देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरु आहे. दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. आंदोलन करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे बंगळुरु येथे इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. येथे जवळपास ३० जणांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलकांनी आज शहरात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. बंगळुरु पोलिसांनी या आंदोलनासाठी मंजूरी दिली नव्हती. आंदोलक रस्त्यावर उतरणार असल्याने सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पोलीस तैनात करण्यात आले होते. रामचंद्र गुहादेखील आंदोलकांमध्ये सहभागी झाले होते. यानंतर पोलिसांनी कारवाई करत जवळपास ३० जणांना ताब्यात घेतलं. यावेळी काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

कर्नाटकमधील कलबुर्गी येथे डावे नेते तसंच मुस्लिम संघटनांशी संबंधित नेत्यांनी नागरिकत्व कायद्याला विरोध केला आहे. आंदोलन करणाऱ्या २० जणांना येथे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात जमाबवंदी लागू करण्यात आल्यानंतर हजारोंच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी दिली नव्हती. यामुळे अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं.