सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन (कॅब) दिल्लीत पुन्हा एकदा हिंसाचार झाला आहे. दिल्लीमधील सीलमपूर आणि जाफराबाद येथे पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी बसेसवर दगडफेक करत तोडफोड केली. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक मेट्रो स्थानकांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आंदोलनादरम्यान दगडफेक होत असल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. तसंच अश्रूधुराच्या नळकांड्याही सोडण्यात आल्या. दरम्यान एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये आंदोलक पोलिसांचा पाठलाग करत त्यांच्यावर दगडफेक करत असल्याचं दिसत आहे. एएनआयने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, हिंसाचारात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, “अत्यंत शांतपणे निदर्शन सुरु होतं. मात्र काही वेळाने हिंसाचार सुरु झाला”. हिंसाचार सुरु झाल्यानंतर अनेक मेट्रो स्थानकांचे गेट बंद करण्यात आले होते. यावेळी कोणतीही मेट्रो स्थानकांवर थांबवण्यात येत नव्हती. परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचं पोलीस सांगत असून मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

आंदोलकांनी हिंसाचार करताना काही बसेसची तोडफोड करत आग लावली. निदर्शन सुरु असल्याने मेट्रोसहित अनेक ठिकाणी रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “सीलमपूर येथे लोक एकत्र आले होते. जवळपास १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आंदोलानाला सुरुवात केली. यावेळी कॅब आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात (एनआरसी) घोषणा देण्यात आल्या”.