नागरिकत्व कायद्यात दुरूस्ती केल्यानंतर ईशान्येत झालेला उद्रेक हळूहळू देशभर पसरू लागला आहे. रविवारी राजधानी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात आंदोलक विद्यार्थी आणि पोलीस आमनेसामने आले. यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे पडसाद सोमवारी देशभरात उमटू लागले आहेत. आयआयटी मुंबईसह देशातील अनेक शैक्षणिक संस्थामधून कायद्याला विरोध होऊ लागला आहे. लखनऊतील नदवा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निदर्शनं सुरू केली. यावेळी पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यानंतर दगडफेक झाली.

Live Blog

17:09 (IST)16 Dec 2019
माझी लढाई संविधान वाचवण्यासाठी -खासदार ओवैसी

नागरिकत्व कायद्याला विरोध असण्यामागील भूमिकेविषयी आजतक वृत्तवाहिन्याच्या कार्यक्रमात बोलताना ओवैसी म्हणाले, 'माझी लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे. माझी लढाई देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या आणि धर्मनिरपेक्ष संविधान देणाऱ्यांसाठी आहे. मला पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातील मुस्लिमांशी काही देणंघेणं नाही. धर्माच्या आधारावर कायदा बनवला आहे. जे कलम १४ आणि २० चं उल्लंघन आहे. मला राग या गोष्टीचा आहे की, आसाममध्ये पाच लाख ४० हजार हिंदू आहेत. त्यांना नागरिकत्व दिलं जाणार आहे. फक्त मुस्लिमांवर खटले चालणार. देशात दुहेरी नागरिकत्वाचे कायदे बनवले जाणार आहे.

16:12 (IST)16 Dec 2019
भाजपा चांगल्या आंदोलनाला बदनाम करण्याचं काम करते -हार्दिक पटेल

पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. "आज दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांसोबत जे झालं. असंच चार वर्षापूर्वी गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आंदोलनावेळी झालं होतं. पोलीस आणि सरकारमधील लोकांनी जाळपोळ आणि वाहनांचं नुकसान केलं आणि आंदोलकांचं नाव पुढे करण्यात आलं," असा आरोप पटेल यांनी केला आहे.

14:18 (IST)16 Dec 2019
मोदी यांचं देशवासीयांना शांतता राखण्याचं आवाहन

देशभरात सुरू असलेल्या हिंसक घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. "सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात हिंसक मार्गानं करण्यात येत असलेली आंदोलनं दुर्दैवी आणि वेदनादायी आहेत. वादविवाद, चर्चा लोकशाहीचा भाग आहेत. त्यामुळे सार्वजनिक संपत्तीचं नुकसान टाळून जनजीवन विस्कळीत होणार नाही," असं आवाहन मोदी यांनी केलं आहे.

13:52 (IST)16 Dec 2019
केजरीवाल घेणार अमित शाह यांची भेट

रविवारी झालेल्या आंदोलनानंतर हिंसाचार उफाळला होता. या घटनेनंतर दिल्लीतील वातावरण तणावपूर्ण असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चिंता व्यक्त केली आहे. "दिल्लीतील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेविषयी मी चिंतित आहे. दिल्लीत शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून, त्यासाठी वेळ मागितला आहे.

13:29 (IST)16 Dec 2019
नागरिकत्व कायद्याविरोधात ममता बॅनर्जी रस्त्यावर

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व कायदा आणि एनआरसी राज्यात लागू होऊ देणार नाही, असं सांगत त्याविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. कोलकातामध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली मार्च निघाला असून, पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

13:06 (IST)16 Dec 2019
दिल्ली पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करणार -कुलगुरू

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी विद्यापीठात घुसून कारवाई केली होती. या कारवाईवर विद्यापीठाच्या कुलगुरू नजमा अख्तर यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली. "परवानगीशिवाय पोलिसांनी विद्यापीठात येणं चुकीचं आहे. हिंसाचारात विद्यापीठाचं मोठं नुकसान झालं आहे. कालचा हिंसेचा प्रकार दुर्दैवी आहे. ग्रंथालयात बसलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. यासंदर्भात पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करणार आहे," अशी माहिती अख्तर यांनी दिली.

12:38 (IST)16 Dec 2019
CAB  आणि NRC भारतीयांमध्ये फूट पाडणारी अस्त्रे -राहुल गांधी

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी ट्विट करून मोदी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. मोदी सरकारनं लागू केलेल्या नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि एनआरसी कायदा हे दोन्ही कायदे भारतीयांमध्ये फूट पाडणारी अस्त्रे असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. त्याचबरोबर याचा विरोध करण्यासाठी अहिंसक मार्गानं सत्याग्रह करणे हाच चांगला मार्ग आहे, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. 

12:09 (IST)16 Dec 2019
मुंबई : 'टिस'मधील विद्यार्थ्यांचा वर्गावर बहिष्कार

दिल्लीतील जामिया विद्यापीठात झालेल्या पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टिस) या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांनी शिकवणी वर्गावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी टिसच्या मुख्य प्रवेश द्वारापासून चेंबूर येथील आंबेडकर गार्डनपर्यंत रॅली काढणार आहेत.

12:03 (IST)16 Dec 2019
नादवा महाविद्यालयात दगडफेक


नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात रविवारी दिल्लीत आंदोलन झाल्यानंतर सोमवारी लखनऊमधील नादवा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. दिल्लीतील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी महाविद्यालयाचं प्रवेशद्वार बंद केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.