अभिनेता सुशांत सिंह याने ट्विट करत आता आपण सावधान इंडिया कार्यक्रमाचा भाग नसल्याचं जाहीर केलं आहे. सुशांत सिंह याने सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात सहभाग घेतल्यानेच कार्यक्रमातून काढण्यात आलं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सुशांत सिंह लवकरच ‘रंगबाज फिरसे’ या वेब सीरिमध्ये झळकणार आहे. यानिमित्ताने इंडियन एक्स्प्रेसने त्याच्याशी गप्पा मारत नेमकं काय झालं आहे यासंबंधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी बोलताना सुशांत सिंहने सांगितलं की, “मलादेखील काल रात्रीच माझा करार रद्द करण्यात आला असल्याची माहिती मिळाली. मला कोणतंही व्यवस्थित कारण देण्यात आलं नाही. मला कोणतेही अंदाज व्यक्त करायचे नाहीत. ज्यादिवशी मी आंदोलनात सहभागी झालो त्याच दिवशी करार रद्द होणे हा योगायोग असू शकतो. मला खरंच कारण माहित नाही. पण चॅनेलकडे सूत्रसंचालक बदलण्याचा हक्क आहे”.

यावेळी सुशांतला त्याने एका ट्विटला ही छोटीशी किंमत आहे असं उत्तर दिल्यासंबंधी विचारलं तेव्हा त्यांने सांगितलं की, “मी केलेल्या कृतीचा ही परिणाम असावा असं मला वाटलं, त्यामुळेच मी ते उत्तर दिलं. जे काही सुरु आहे ते भयानक असून माझ्या कृतीबद्दल मला कोणताही खेद नाही”.

अनेक अभिनेते हातातील काम जाईल या भीतीने बोलत नाहीत असं विचारलं असता सुशांतने उत्तर दिलं की, “मी इतरांची जबाबदारी घेऊ शकत नाही. पण माझा माझ्यावर विश्वास असून मी बोलणार. कोणीच बोलत नाही असंही नाही. रिचा चढ्ढा, तापसी पन्नू, अनुभव सिन्हा यांच्यासारखे अनेक सेलिब्रेटी आपलं मत व्यक्त करत आहेत. ज्यांना चुकीचं झालं असं वाटत आहे ते बोलत आहेत, आणि ज्यांना वाटत नाही ते शांत आहे. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि आपण त्यांचा मतांचा आदर केला पाहिजे”.

“हातातील काम जाण्याबद्दल बोलत असाल तर मी इतरांबद्दल बोलू शकत नाही. पण माझ्याबद्दल सांगायचं झाल्यास, माझं एक साधं तत्व आहे. मी माझं टॅलेंट विकतो, विवेकबुद्दी नाही. जेव्हा माझी मुलं मोठी झाल्यावर विद्यार्थ्यांना मारहाण होत असताना तुम्ही काय करत होतात असं विचारतील तेव्हा मी उत्तर देऊ शकलो पाहिजे,” असं सुशांत सिंहने सांगितलं आहे.

दरम्यान दिल्लीत झालेल्या घटनावंर बोलताना सुशांत सिंहने सांगितलं की, “ज्याप्रकारे विद्यार्थ्यांना वागणूक देण्यात आली ते पाहून मला धक्का बसला आहे. आधी जेएनयूमध्ये असं झालं. खोटा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना तुकडे तुकडे गँग असा टॅग देण्यात आला. कोणीही त्यांची माफी मागितली नाही. त्यांना अजूनही त्याच नावाने हाक मारली जाते. अगदी त्याचप्रमाणे जामियामधील विद्यार्थी हिंसाचारात सहभागी नव्हते. पोलिसांनीही स्पष्ट केलं आहे. तरीही त्यांच्यासोबत काय झालं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. बस जळतानाचं फुटेज आहे पण त्या कोणी जाळल्या याचं नाही हे आश्चर्य वाटणारं आहे. एका विशिष्ट समाजाचा आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. ते आपलं भविष्य आहेत आणि आपण असं शांत बसू शकत नाही”.