सुधारित नागरिकत्व कायद्याला ईशान्य भारतात तीव्र विरोध सुरूच असून शनिवारीही राज्यभर निदर्शने करण्यात आली. लोकांनी रेल्वेमार्ग अडवला, तसेच निरनिराळ्या संघटनांनी धरणे दिली व उपोषणही केले. तर, सोनितपूर जिल्ह्य़ात लोकांनी एक ऑइल टँकर पेटवून दिल्यामुळे त्याचा चालक जळून मृत्युमुखी पडला. हिंसक निदर्शने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे.

दरम्यान, गुवाहाटीमध्ये आज सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत संचारबंदी शिथील करण्यात आली आहे. कॅब मंजूर झाल्यानंतर राज्यात हिंसक निदर्शने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखालील एक समिती लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. भाजपाचे आमदार आणि खासदार यांच्या बैठकीत मोदी आणि शाह यांची भेट घेऊन त्यांना स्थितीची माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आसामचे संसदीय कामकाजमंत्री चंद्र मोहन पटोवारी यांनी शनिवारी सांगितले.

दरम्यान, या कायद्याविरुद्ध आंदोलन करीत असलेल्या आसू, आसाम जातीयवादी युवा छात्र परिषद (एजेवायसीपी) आणि स्थानिक लोकांच्या ३० इतर संघटनांनी ब्रह्मपुत्र खोऱ्यातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, कलाकार, गायक, बुद्धिवादी आणि शिक्षक यांच्यासमवेत निदर्शने केली.

तर, उदलगुडी जिल्ह्य़ातील सिपाझार येथून इंधन भरण्यासाठी जात असलेल्या तेलाच्या रिकाम्या टँकरला सोनितपूरमधील ढेकियाजुली येथे काही लोकांनी शुक्रवारी रात्री आग लावली. यात जळून गंभीर जखमी झालेल्या टँकरचालकाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र शनिवारी सकाळी तो मरण पावला, असे पोलिसांनी सांगितले.

एजेवायसीपीने कामाख्या रेल्वे स्थानकावरील रेल्वेमार्ग अडवला. यामुळे गुवाहाटीपासून देशाच्या इतर भागांकडे जाणाऱ्या रेल्वेसेवा विस्कळीत झाल्या. आम्हाला लोकांची गैरसोय करायची नाही, मात्र या सुधारित कायद्यामळे राज्याच्या लोकांना असलेल्या धोक्याकडे देशभरातील लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही असे केले आहे, असे संघटनेचे सरचिटणीस पलाश चांगमाई म्हणाले.

राज्यभरात लोक आणि विद्यार्थी यांची निदर्शने सुरू असून, ती दररोज सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालतील, असे ‘आसू’चे सरचिटणीस लुरिंज्योती गोगोई यांनी पीटीआयला सांगितले. संघटनेने १६ डिसेंबरपासून तीन दिवसांच्या सत्याग्रहाचे आवाहन केले आहे.

काँग्रेस हिंसाचाराला खतपाणी घालत असल्याचा शाहंचा आरोप
नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून (कॅब) काँग्रेस हिंसाचाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी  केला.

दरम्यान, या कायद्यामुळे आसामसह ईशान्येकडील जनतेची संस्कृती, भाषा, सामाजिक ओळख आणि राजकीय हक्क यांना बाधा येणार नाही, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

झारखंडमधील गिरिदीह, बागमारा आणि देवघर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारसभेत शाह म्हणाले की, कॅब मंजूर झाल्याने विरोधकांना पोटदुखी होत आहे आणि त्यामुळे ते हिंसाचाराला खतपाणी घालत आहेत.