Citizenship Amendment Bill (CAB) ला राज्यसभेत बुधवारीच मंजुरी मिळाली. मात्र त्यानंतर आसाम आणि त्रिपुरा या दोन्ही राज्यांमध्ये विरोधाचा आगडोंब उसळला आहे. आसाम मध्ये या विधेयकाला विरोध करत असताना जो हिंसाचार उसळला त्या हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार आसाममध्ये CAB चा विरोध करणाऱ्या आंदोलकांचा पोलिसांसोबत वाद झाला, त्यानंतर हे कार्यकर्ते आणि पोलीस भिडले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. या घटनेत पाच आंदोलक जखमी झाले. या पाचपैकी तिघांचा मृत्यू झाला.

गोळीबारात जखमी झालेल्या आंदोलकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरु असतानाच पाचपैकी तिघांचा मृत्यू झाला. गुवाहाटी मेडिकल कॉलेज रुग्णालयाचे अधीक्षक रामेन तालुकदार यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या आंदोलकांचा मृत्यू झाला त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या तीन आंदोलकांचा मृत्यू झाल्यानंतर या आंदोलनाने आता जास्त प्रक्षोभक रुप घेतलं आहे. आसाम आणि त्रिपुरा या दोन्ही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरुन नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (CAB) चा निषेध करत आहेत.

CAB ला संसदेत मंजुरी मिळाली आहे. ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या बिगर मुस्लिम शरणार्थींना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. हिंदू, शीख, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन धर्माच्या लोकांना भारतीय नागरिकत्त्व या दुरुस्ती विधेयकामुळे मिळू शकतं. मात्र या विधेयकाला आसाम आणि त्रिपुरा या दोन्ही राज्यातल्या नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. याच दरम्यान आंदोलन सुरु असताना तिघांचा मृत्यू झाला आहे.

लक्षवेधी घटना –

 आसाममध्ये पुढच्या ४८ तासांसाठी मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

 गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांना हटवण्यात आले आहे. मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी त्यांच्याजागी पदभार स्वीकारला आहे.

 धाकुआखाना, लखीमपूर जिल्ह्यात आंदोलकांनी भाजपा आणि आसाम गण परिषदेचे कार्यालय पेटवून दिले.

 हिंसक आंदोलनाचा ईशान्येकडच्या राज्यामधील हवाई आणि रेल्वे सेवेला फटका बसला आहे.

– आंदोलनामुळे अनेक खासगी विमान कंपन्यांनी कोलकाताहून आसाम आणि अन्य ईशान्येकडच्या राज्यांमध्ये जाणारी विमाने रद्द केली आहेत.

 त्रिपुरा आणि आसाममधील रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे.

 गुवाहाटीमध्ये अनेक नागरिकांनी संचारबंदी झुगारत रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलन केले. पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी गोळीबार करावा लागला. गोळीबारात चार जण जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.