चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअर (सीपीइसी) अंतर्गत चीन ग्वादार येथे आपल्या ५ लाख नागरिकांसाठी १५ कोटी डॉलरची गुंतवणूक करत एक शहर वसवत आहे. दक्षिण अशियातील चीनचे अशाप्रकारचे हे पहिले शहर असेल. या प्रस्तावित शहरात २०२२ पासून सुमारे ५ लाख लोक राहायला येतील.

चीनच्या योजनेनुसार, हे लोक पाकिस्तानच्या ग्वादार बंदरात होत असलेल्या शहरात काम करतील. या रहिवासी भागात फक्त चीनचे नागरिक राहतील. याचाच अर्थ पाकिस्तानच्या या क्षेत्राचा उपयोग चीन शहरासारखा करेन, असे वृत्त ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिले आहे. चीनने पाकिस्तान इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनकडून ३६ लाख चौरस फुटाचे आंतरराष्ट्रीय पोर्ट शहर खरेदी केले आहे. यावर १५ कोटी डॉलरमध्ये एक रहिवासी प्रकल्प राबवला जाणार आहे. इथे २०२२ पासून ५ लाख कर्मचारी राहायला येतील. चीनने आफ्रिका आणि मध्य आशियामधील प्रकल्पावर काम करणाऱ्या नागरिकांसाठी तिथे कॉम्प्लेक्स आणि उपशहर वसवले आहे. चिनी नागरिकांवर पूर्व रशिया आणि म्यानमारच्या उत्तरेकडील भागांवर कब्जा केल्याचा आरोप आहे. चिनी नागरिकांना अशा प्रकारे शहर वसवण्यासाठी दिल्याने स्थानिक लोकांमध्ये नाराजी आहे.

चीनने पाकिस्तानच्या पाइपलाइन, रेल्वे, महामार्ग, ऊर्जा प्रकल्प, औद्योगिक क्षेत्रात आणि मोबाइल नेटवर्कमध्ये गुंतवणूक केली आहे. ३९ प्रस्तावित सीपीइसी प्रकल्पांपैकी १९ पूर्ण झाले आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. यावर चीनने २०१५ पासून सुमारे १८.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.