करोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने अनेकांच्या हातून रोजगार गेला असून पोटावर हात असणाऱ्यांना रोज नव्या संकटांना सामोरं जावं लागत आहे. दरम्यान मध्य प्रदेशातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत इंदूर येथे महापालिका अधिकाऱ्यांनी १४ वर्षाच्या मुलाची अंड्यांनी भरलेली हातगाडी रस्त्यावर पलटी केल्याचं दिसत आहे. आपण १०० रुपयांची लाच देण्यास नकार दिल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी गाडी पलटी करुन अंड्यांची नासधूस केल्याचा आरोप मुलांनी केला आहे.

इंदूर येथे हा प्रकार घडला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मुलाने केलेल्या दाव्यानुसार, पालिका कर्मचाऱ्यांनी १०० रुपये दे किंवा येथून हातगाडी हटव असं सांगितलं होतं. पण आपण लाच देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी हातगाडी पलटी केली. यामुळे हातगाडीवरील सर्व अंड्यांचं नुकसान झालं.

व्हिडीओत आपलं नुकसान झाल्याने हतबल झालेला मुलगा दोन व्यक्तींवर आपला संताप व्यक्त करत असल्याचं दिसत आहे. हे लोक पालिका कर्मचारी असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेवर नेटिझन्सदेखील संताप आणि हळहळ व्यक्त करत आहेत.