एअर इंडिया बंद करणे हा पर्याय असू शकत नाही त्यापेक्षा एअर इंडियाचे खासगीकरण शक्य आहे असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत एअर इंडियाबाबत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मुंबई विमानतळ बंद झालेले नाही. कारण दर तासाला या विमानतळाच्या धावपट्टीवरून ४५ विमानं उड्डाण घेत होती. आता ही संख्या ३६ वर आली आहे. ज्या अडचणी आहेत त्या लवकरच दूर केल्या जातील असंही पुरी यांनी म्हटलं आहे. तसेच खासगीकरण हा चांगला पर्याय आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

एवढंच नाही तर एअर इंडिया ही कंपनी चालवणे सरकारला अशक्य होऊन बसले आहे. कंपनीला दररोज १५ कोटींचे नुकसान सहन करावे लागते आहे. २० विमानांची कमतरता जाणवते आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी निर्गुंतवणूक हा पर्याय आहे असंही पुरी यांनी म्हटलं आहे.

एअर इंडिया या कंपनीपुढे आर्थिक संकट आ वासून उभं राहिलं आहे. ज्यामुळे ऑक्टोबर महिन्यानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळणे कठीण होईल अशी शक्यता कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. अशात आता खासगीकरणाचा पर्याय सुचवण्यात आला आहे.

आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या एअर इंडियाला सरकारने सात हजार कोटींची सॉव्हरिन हमी दिली आहे. यापैकी २५०० कोटी रूपये शिल्लक असून या निधीचाही उपयोग विविध कारणांसाठी करावा लागणार आहे. यापैकी बरीचशी रक्कम इंधन कंपन्या, विमानतळ ऑपरेटर्स आणि पगार खात्यावर जमा करावी लागणार आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे मासिक देयक ३०० कोटींचे आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांचे पगार देणे कठीण होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.