सनदी अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांच्या निलंबनावरून वाद सुरू असतानाच उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी सनदी अधिकाऱ्यांवरील टीका सुरूच ठेवली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी देशातील सनदी अधिकारी आजही जनतेशी वागताना स्वत:ला राजा-महाराजा समजतात, अशी टीका आझम खान यांनी रविवारी केली.
अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना आझम यांनी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेतले.
देशावर इंग्रजांचे राज्य असताना भारतीयांवर वचक राहावा, यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देतानाच त्यांची मानसिकता राजा असल्यासारखी निर्माण केली जाते. मात्र आता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सरकारी अधिकाऱ्यांची राजासारखी मानसिकता गेलेली नाही, अशी टीका आझम खान यांनी केली. काही मूठभर सनदी अधिकारी संपूर्ण यंत्रणेवर वरचष्मा गाजवायला बघतात, मग इतर मूर्ख आहेत का, असा प्रश्न आझम खान यांनी उपस्थित केला.
ब्रिटन,रशिया, चीन, जपानसारख्या देशांत सनदी अधिकाऱ्यांचा वरचष्मा नसतो. भारतातही अशा गोष्टींना थारा नाही, मात्र तरीही सनदी अधिकारी स्वत:ला राजासारखे मानतात, अशी टीका आझम खान यांनी केली.