आंदोलकांवर लष्कराने केलेल्या गोळीबारात एक ठार
लष्कराच्या जवानाने विनयभंग केल्याच्या आरोपावरून काश्मीर खोऱ्यातील तणावपूर्ण वातावरण निवळत असतानाच शुक्रवारी कुपवाडा जिल्ह्य़ातील लष्करी तळावर दगडफेक करणाऱ्या आंदोलकांवर सुरक्षा दलांनी गोळीबार केला. त्यात एक तरुण ठार झाला तर तिघे जण जखमी झाले. या घटनेमुळे पुन्हा एकदा खोऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लष्करी जवानाने तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून हंडवारा जिल्ह्य़ात लष्कराविरोधात आंदोलन सुरू आहे. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले होते. दरम्यान, संबंधित तरुणीने विनयभंग झाला नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत सांगितल्याने तणावाची स्थिती निवळली होती. परंतु लष्कराविरोधात धुसफुस सुरूच होती. कुपवाडा जिल्ह्य़ात त्यावरूनच आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान कुपवाडाच्या नथनुसा भागातील लष्कराच्या एका तळावर निदर्शकांच्या एका गटाने दगडफेक सुरू केली.
सुरक्षा दलांनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात चार जण जखमी झाले. त्यापैकी गंभीर जखमी झालेला आरिफ मोहम्मद हा तरुण नंतर मरण पावला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान या घटनेच्या विरोधात फुटीरतावादी हुरियन कॉन्फरन्सने शनिवारी बंद पुकारला आहे. काश्मीर विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.