हैदराबाद येथील बलात्कार-खून प्रकरण आणि त्यातील चार आरोपींना पोलिसांनी चकमकीत ठार केल्याच्या पार्श्वभूमीवर, सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी, ‘न्याय कधीच तात्काळ असू शकत नाही आणि त्याने ‘सूडाचे’ रूप घेतले तर त्याचे ‘न्याय’ हे स्वरूपच संपुष्टात येते, असे परखड मत शनिवारी व्यक्त केले.

एखादे फौजदारी प्रकरण निकालात काढण्यासाठी लागणारा वेळ, त्यात येणारी शिथिलता, तसेच त्यासाठी लागणारा प्रत्यक्ष वेळ याबाबत फौजदारी न्याय यंत्रणेने आपली भूमिका आणि दृष्टिकोन पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे, असेही मत सरन्यायाधीश बोबडे यांनी व्यक्त केले.  राजस्थान उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात सरन्यायाधीश बोबडे यांनी महिलांवरील अत्याचारांच्या अनुषंगाने सुरू झालेल्या जलद न्यायदानाच्या चर्चेबाबत सडेतोड मते मांडली.

देशात अलीकडे घडलेल्या घटनांमुळे एक जुनीच चर्चा पुन्हा उफाळून आल्याचे सरन्यायाधीशांनी मान्य केले. ते म्हणाले, न्याय कधीही तात्काळ असू शकत नाही किंवा तो तसा असू नये आणि न्यायाने सूडाचे स्वरूप घेऊ नये, असे मला वाटते.

हैदराबाद बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपींना तपासाचा भाग म्हणून घटनास्थळावर नेण्यात आले असताना त्यांच्यापैकी दोघांनी पोलिसांची शस्त्रे हिसकावून गोळीबार करून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चौघेही ठार झाले, असा दावा पोलिसांनी केल्याच्या दुसऱ्या दिवशी सरन्यायाधीशांनी केलेल्या मतप्रदर्शनाला महत्त्व आहे.

उन्नावमधील पीडितेचा मृत्यू

नवी दिल्ली :  बलात्कार प्रकरणातील आरोपींनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे ९० टक्के होरपळलेल्या २३ वर्षीय पीडित महिलेचा शुक्रवारी रात्री सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला.

सफदरजंग रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शलभ कुमार यांनी सांगितले की, आम्ही शर्थीचे प्रयत्न केले, परंतु ती वाचू शकली नाही. तिची प्रकृती शुक्रवारी सायंकाळीच चिंताजनक बनली होती. तिला रात्री ११.१० वाजता हृदयविकाराचा झटका आला. तिला वाचवण्यासाठी

शर्थीचे प्रयत्न केले, पण ११.४० वाजता तिचा मृत्यू झाला. ही महिला शुक्रवारी न्यायालयात सुनावणीसाठी जात असताना आरोपीसह पाच जणांनी तिला रस्त्यात गाठून तिच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ती ९० टक्के होरपळली होती. तिला हवाई रुग्णवाहिकेने दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करून कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवले होते. अखेर तिची मृत्यूशी झुंज शुक्रवारी रात्री अपयशी ठरली.  आरोपींनी रॉकेल ओतून पेटवल्याने शरीराचा भडका उडालेल्या अवस्थेत ती मदतीची याचना करत एक किलोमीटपर्यंत सैरावैरा धावत होती. काही नागरिकांनी तिला लखनौ येथील रुग्णालयात दाखल केले. नंतर हवाई रुग्णवाहिकेतून तिला दिल्लीला हलवण्यात आले. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात तिने सुमारे ४० तास मृत्यूशी झुंज दिली. पण शुक्रवारी रात्री ११.४० वाजता तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाकडे देण्यात आला. तेथे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

प्रकरणाची पार्श्वभूमी

पीडित महिलेवर आरोपींनी डिसेंबर २०१८ मध्ये सामूहिक बलात्कार केला होता. त्यातील एक आरोपी फरार असून एकाला न्यायालयाने जामीन दिला होता. ही महिला खटल्याच्या सुनावणीसाठी रायबरेलीस निघाली होती. जामीन दिलेल्या आरोपीसह एकूण पाच जणांनी रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर पहाटे चारच्या सुमारास तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवले होते. या गुन्ह्य़ातील आरोपींची नावे हरिशंकर त्रिवेदी, रामकिशोर त्रिवेदी, उमेश वाजपेयी, शिवम त्रिवेदी आणि सुभम त्रिवेदी अशी आहेत. त्यापैकी शिवम आणि शुभम यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

जलदगती न्यायालयात खटला 

सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवण्यात येईल असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी जाहीर केले. उत्तर प्रदेशचे न्यायमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले की, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची विनंती केली जाईल. या खटल्याची सुनावणी दैनंदिन पातळीवर व्हावी, असे प्रयत्न केले जातील.

घर आणि २५ लाखांची मदत

पीडित महिलेच्या कुटुंबियांना पंतप्रधान आवास योजनेतून घर आणि २५ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी केली. पीडित महिलेच्या नातलगांना त्वरित आर्थिक मदत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

बुलढाण्यातही अत्याचार, हत्या

अकोला : बुलढाणा जिल्हय़ातील एका गावात महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करून आरोपीला अटक केली.

ही महिला चुलत भावाच्या घरी एकटीच राहत होती. शनिवारी सकाळी तिचा मृतदेह आढळल्यानंतर याची माहिती जळगाव जामोद पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून श्वान पथकाला पाचारण केले. श्वानाने शेजारच्याच घराच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या संजय गणेशराव कराळे ऊर्फ रितेश गजानन देशमुख याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हय़ाची कबुली दिली. आरोपीने त्याच्या पत्नीकडेही बलात्कार आणि हत्येची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. परिस्थितीजन्य पुरावे आढळल्याने आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने रक्ताने माखलेले कपडे रात्रीच धुतल्याचेही उघडकीस आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याने महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे सकृद्दर्शनी आढळले, असे बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी सांगितले.