भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकेकाळी चहा विकण्याचा व्यवसाय करत होते, राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे एका दलित कुटुंबातून आले आहेत, माझा जन्म केनियामध्ये झाला तरीही मी आज या देशाचा सरन्यायाधीश आहे स्वातंत्र्य म्हणतात ते यापेक्षा वेगळं ते काय? असा प्रश्न विचारत सरन्यायाधीश जगदीश सिंह खेहर यांनी स्वातंत्र्याची नवी व्याख्या समाजावून सांगितली आहे. तसंच भारत हा लोकशाही प्रधान देश असून या देशात सर्व धर्मांचा आदर राखला जातो ही बाब अत्यंत स्तुत्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सुप्रीम कोर्ट परिसरात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी खेहर यांनी आपले रोखठोक विचार मांडले. भारतात विविध धर्माचे आणि जातीचे लोक राहतात, त्याचमुळे भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. आजच्या घडीला प्रत्येकजण एकमेकांना साथ देताना दिसतो, देशात समानता दिसून येते जेव्हा तुम्ही निर्णय घ्यायला स्वतंत्र असता तेव्हाच देशात असंच वातावरण दिसतं असंही खेहर यांनी म्हटलं आहे. भारत हा देश प्रत्येक धर्माचा आदर करतो त्याचमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला देशाबद्दल अभिमान आहे या देशाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे असंही खेहर यांनी स्पष्ट केलं.

आपल्या भाषणात जे. एस. खेहर यांनी अनेक जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. ‘शिख आहे याचा गर्व आहे’ असा संदेश असलेला एक टीशर्ट माझ्या मुलानं मला भेट म्हणून दिला होता, मात्र हा टी-शर्ट मी आधीच का घातला नाही? असाही विचार माझ्या मनात त्यावेळी डोकावला, मला पूर्ण जाणीव आहे की मी अशा एका देशात राहतो जिथे आपल्या धर्मावर गर्व असणं ही सन्मानाची गोष्ट आहे. माझ्या मुलानं दिलेला टीशर्ट मी आनंदानं घातला. आपल्या देशात फक्त शिखच नाही तर प्रत्येक धर्माचा सन्मान केला जातो, ही बाब अभिमानाची आहे. आज झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचीही उपस्थिती होती.

आपल्या भाषणांमध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिकांचा आपल्याला विसर पडल्याचंही जे. एस. खेहर यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिक असे आहेत ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं मात्र आपल्याला त्यांची नावंही ठाऊक नाहीत, अब्दुल्ला आणि शेर अली आफरिदी हे असेच स्वातंत्र्य सैनिक आहेत जे विस्मृतीत गेले आहेत. या दोघांनाही स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा मिळायला हवा असंही खेहर यांनी म्हटलं आहे.