सुप्रीम कोर्टातील एका कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला असून या आरोपांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी उत्तर दिले आहे. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात असून महिलेच्या मागे काही शक्तिशाली लोकांचा हात असावा, असे त्यांनी म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टात ज्यूनियर कोर्ट असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. सध्या संबंधित महिला सुप्रीम कोर्टात कार्यरत नाही. महिलेने सुप्रीम कोर्टात यासंदर्भात तक्रार दिली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. अरुण मिश्रा आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर या तक्रारीची शनिवारी सकाळी तातडीने सुनावणी झाली. सरन्यायाधीश म्हणाले, २० वर्ष न्यायपालिकेत नि:स्वार्थ सेवा केल्यानंतर माझ्या बँकेत ६ लाख ८० हजार रुपये जमा आहे. पीएफ खात्यात ४० लाख रुपये आहेत. काही शक्तींना माझ्याविरोधात काहीच मिळत नसल्याने त्यांनी आता एका महिलेचा आधार घेत माझ्यावर आरोप केले. या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी निर्णय देणे टाळले. तर अन्य न्या. मिश्रा आणि न्या. खन्ना यांनी माध्यमांनी जबाबदारीने वागावे, असे सांगितले. सत्यतेची पडताळणी केल्याशिवाय माध्यमांनी महिलेच्या आरोपांना प्रसिद्धी देऊ नये, असेही त्यांनी नमूद केले.

प्रसारमाध्यमांनी महिलेच्या आरोपांना प्रसिद्धी देताना संयम बाळगावा असे आवाहनही केले आहे. महिलेच्या आरोपांची शहानिशा न कता बातम्या देण्यामुळे न्याययंत्रणेचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते अशी भीतीही न्यायालयानं व्यक्त केली आहे.

सरन्यायाधीशांनी सांगितले की, लैंगिक छळाचे आरोप करणारी महिलाच चार दिवस तुरुंगात होती आणि तिची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तसेच तिला पोलिसांनीही तंबी दिली होती. देशाच्या न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात असून काही शक्तींचा या महिलेला पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला.

सुप्रीम कोर्टाचे महासचिव संजीव सुधाकर कलगावकर यांनी सांगितले की, या महिलेने केलेले सर्व आरोप बदनामी करणारे व बिनबुडाचे आहेत. यावर सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीशांवर आरोप करणारे पत्र या महिलेने अनेक न्यायाधीशांना पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.