चीनच्या उत्तरेकडील भागात तब्बल १०० भटक्या कुत्र्यांना जमिनीत जिवंत गाडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. संकेतस्थळांवर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच प्राणीप्रेमींचा संताप उफाळून आला आहे.
भटक्या कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संघटनेने याबाबतची छायाचित्रे प्रकाशित केल्यानंतर देशात एकच खळबळ उडाल्याचे सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले आहे.
तान नावाच्या महिलेने या भयानक प्रकाराची छायाचित्रे काढली आणि आपल्या काही मित्रांच्या मदतीने सिना वेईबो या संकेतस्थळाचे कार्यालय गाठले आणि छायाचित्रे दाखवली. शंभरहून अधिक कुत्र्यांना बुधवारी खोल खड्डय़ात गाडले गेले होते. त्यामध्ये लहान पिल्लांचाही समावेश होता.
या प्रकाराची माहिती मिळताच काही जणांनी घटनास्थळी धाव घेत दोरीच्या साहाय्याने त्या कुत्र्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र केवळ २० कुत्र्यांना वाचवण्यात यश आल्याचे तान हिने सांगितले.
स्थानिक सरकारी विभागाने अशाप्रकारे जिवंत कुत्र्यांना गाढल्याचा आरोप केला जात आहे, मात्र स्थानिक प्रशासनाने हा आरोप फेटाळला आहे.
स्थानिक नागरिकांनी भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबद्दल तक्रारी केल्यानंतर काही कुत्र्यांना पकडून त्यांना एका ठिकाणी ठेवण्यात आल्याचेही प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, इंटरनेटच्या माध्यमातून याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.