पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या वाढीच्या निषेधार्थ आज विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी बंद पाडले. भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, अण्णाद्रमुक तसेच यूपीए सरकारला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी विरोध करीत लोकसभा आणि राज्यसभेत प्रश्नोत्तराचा तास ठप्प केला. राज्यसभेचे चार वेळा तर लोकसभेचे दोन वेळा कामकाज तहकूब करूनही गोंधळ शमला नाही आणि शेवटी दिवसभरासाठी संसदेचे कामकाज स्थगित करावे लागले.
पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी विरोधक सदस्य करीत होते. यूपीए सरकारच्या धोरणांचा निषेध केला. संसदेचे अधिवेशन सुरू असताना संसदेला विश्वासात न घेता पेट्रोल व डिझेलची दरवाढ करणे हा संसदेचा अवमान असल्याचा दावा विरोधी सदस्य करीत होते. पण पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त झाले असून हे निर्णय आता तेल कंपन्या घेतात, असा युक्तिवाद संसदीय कामकाजमंत्री राजीव शुक्ला यांनी केला. दोन्ही सभागृहांचे अनिवार्य कामकाज गोंधळातच पार पडले आणि दिवसभरासाठी संसद तहकूब करण्यात आली.