‘ऑपरेशन ब्लू स्टार’ कारवाईच्या ३१व्या दिनानिमित्त युवकांच्या एका गटाने शनिवारी सुवर्ण मंदिरात खलिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्यानंतर उडालेल्या चकमकीत झालेल्या लाठीमारात पाच जण जखमी झाले.
सुमारे २२ युवकांच्या गटाने मंदिरात येऊन अकाली तख्ताच्या आवाराजवळ खलिस्तानच्या बाजूने घोषणासत्र सुरू केले. शिरोमणी गुरू प्रबंधक समितीच्या सदस्यांनी त्यास अटकाव केला. त्या वेळी झालेल्या लाठीमारात पाच जण जखमी झाले. त्यांच्यापैकी दोघांच्या डोक्याला जखमा झाल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गटातील तरुण खलिस्तानचा पुरस्कार करणाऱ्या घोषणा देत असतानाच मंदिरात आलेले अन्य काही युवकही त्यांना सामील झाले. त्यामुळे शिरोमणी गुरू प्रबंधक समितीच्या सदस्यांनी याची दखल घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या युवकांना बाहेर जाण्याची सूचना केली.
दरम्यान, सुखमणी साहिब सेवा सोसायटी, अखाल स्टुडण्ट्स फेडरेशन व अकाल गट का आखाडा, आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी फगवारा येथे कार्यक्रम आयोजित करून ऑपरेशन ब्लू स्टार कारवाईत ठार झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोफत लंगर आयोजित केले होते.
याखेरीज, तेथे उपस्थित असलेल्यांना मोफत मधुर पाण्याचेही वाटप केले. याच कार्यक्रमात जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचे छायाचित्र असलेले टी शर्टही लोकांना मोफत देण्यात आले. याखेरीज भिंद्रनवाले याची ध्वनिमुद्रित भाषणे सार्वजनिक सभेच्या ठिकाणी ऐकविण्यात आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 7, 2015 4:21 am