पंजाबमधील लुधियाना येथील सेन्ट्रल जेलमध्ये मोठा गोंधळ माजला असून कैद्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरु आहे. सुरुवातीला या कैद्यांनी एकमेकांवर दगडफेक केली त्यानंतर गोळीबारही केला. यामध्ये काही कैदी जखमी झाले आहेत. तसेच एक पोलीस अधिकारीही जखमी झाला असून तुरुंग अधीक्षकाची गाडीही कैद्यांनी जाळली आहे. या गोंधळाचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.


कैद्यांच्या दोन गटांमध्ये हिंसाचार सुरु झाल्यानंतर पोलिसांनी हा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही कैद्यांनी हल्लाबोल केला. दरम्यान, कैद्यांच्या दोन्ही गटांनी एकमेकांवर गोळीबारही केला. त्यामुळे सध्या या तरुंगात तणावाचे वातावरण आहे. कैद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तसेच अतिरिक्त पोलिसांची कुमकही मागवण्यात आली असून जाळपोळीनंतर आग विझवण्यासाठी अग्निशामकच्या गाड्याही जेलमध्ये दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना जेलची नाकाबंदी करण्याचे तसेच दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. सध्या जेलचे सर्व दरवाजेही बंद करण्यात आले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, या गोंधळाचा फायदा घेत काही कैद्यांनी जेलची भिंत ओलांडून पळून जाण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कैद्यांच्या या हल्ल्यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप वडेरा हे जखमी झाले आहेत, इतकेच नव्हे तर जेलच्या पोलीस अधीक्षकांची गाडीही कैद्यांनी पेटवून दिली आहे.