16 December 2017

News Flash

शिंदेंच्या दिलगिरीने संघर्ष टळला!

संसदेच्या गुरुवारपासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हिंदू दहशतवादावरून आक्रमक पवित्रा घेत भाजपने

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली | Updated: February 21, 2013 6:18 AM

संसदेच्या गुरुवारपासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हिंदू दहशतवादावरून आक्रमक पवित्रा घेत भाजपने मनमोहन सिंग सरकारपुढे निर्माण केलेला पेच गृहमंत्री व लोकसभेचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी रात्री सोडवला. शिंदे यांनी आपले विधान मागे घेऊन माफी मागावी अन्यथा संसदेचे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा देत भाजपने दडपण आणले होते. त्याला प्रतिसाद देताना शिंदे यांनी हिंदू दहशतवादाविषयी दिलगिरी व्यक्त करून संसदेतील संभाव्य संघर्ष टाळला.
जयपूर येथे केलेल्या आपल्या विधानामुळे गैरसमज निर्माण झाले. दहशतवादाचा कोणत्याही धर्माशी संबंध जोडण्याचा आपला उद्देश नव्हता, असे नमूद करीत जयपूर येथे काँग्रेसच्या चिंतन शिबिरात हिंदू दहशतवादाच्या विधानाविषयी शिंदे यांनी खेद व्यक्त केला.
तत्पूर्वी भाजपने संसदेत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत, तसेच ‘जंतरमंतर’वर शिंदे यांच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात संसदेचे कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला होता.  मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या काँग्रेसच्या कोअर ग्रुपमध्येही हिंदू दहशतवादाच्या मुद्दय़ावरून निर्माण झालेल्या वादाला कसे निस्तरायचे याविषयी चर्चा करण्यात आली. भाजपचे समाधान होईल, असा तोडगा काढून या प्रकरणाची तीव्रता कमी करण्यासाठी सरकारनेही मधला मार्ग काढण्यावर भर दिला आणि रात्री शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे दिलगिरी व्यक्त केली.
भाजप, तसेच शिवसेनेने शिंदे यांच्या दिलगिरीचे स्वागत केले. शिंदे यांचे निवेदन स्वागतार्ह आहे. मात्र त्यांनी यापूर्वी हे केले असते, तर पाकिस्तानातील दहशतवाद्यांना आनंद व्यक्त करण्याची संधी मिळाली नसती, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्तेरविशंकर प्रसाद यांनी दिली. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी, ‘आता हे प्रकरण संपले आहे,’ असे सांगत त्यावर पडदा टाकला.

दहशतवादाचा कोणत्याही धर्माशी संबंध जोडण्याचा माझा उद्देश नव्हता. जयपूरमधील माझ्या भाषणादरम्यान नाव घेतलेल्या संघटनेशी दहशतवादाचा संबंध असल्याचा कोणताही आधार नाही.
सुशीलकुमार शिंदे, गृहमंत्री

First Published on February 21, 2013 6:18 am

Web Title: clashes avoided due to shindes regreted