मथुरेतील एका बागेतील अतिक्रमण हटवताना तेथील आंदोलक आणि पोलीसांमध्ये झालेल्या गोळीबारात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह २४ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २२ आंदोलकांचा समावेश आहे. गुरुवारी संध्याकाळी उशीरा ही घटना घडली. पोलिसांना घटनास्थळी ४७ देशी कट्टा, ६ रायफल, १७८ जिवंत काडतुसे सापडली आहेत. या घटनेत जखमी झालेल्या २३ पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकूण १९६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मथुरा शहराचे पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि फराह पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संतोष यादव यांच्यावर जमावाने केलेल्या गोळीबारात ते मृत्युमुखी पडले. जवाहर पार्कमधील अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा घेऊन स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. साडेचारच्या सुमारास अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस जवाहर पार्कमध्ये पोहोचले. ‘स्वाधीन भारत सुभाष सेने’ने या कारवाई विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळल्यानंतर लगेचच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी या सेनेच्या आंदोलकांकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात येऊ लागला. आंदोलकांनी या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या डोक्यातच गोळ्या झाडल्या. संतोष यादव यांना रुग्णालयात दाखल केल्यावरच त्यांना मृत घोषित करण्यात आले होते. तर मुकुल द्विवेदी यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
दोन पोलीस अधिकारी आणि इतर २२ आंदोलकांचा यावेळी झालेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक दलजीत सिंग चौधरी यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही अखिलेश यादव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून, आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले.